प्रल्हाद जोशी बेळगावदौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत टोला लगावला होता. याच टोल्याला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिटोला लगावत त्यांची खिल्ली उडविली.
मोदी सरकारमध्ये काय सुरु आहे, महागाई कोणत्या दिशेने चालली आहे, आणि भाजपचा कोणता बस स्टँड आहे हे बिचाऱ्या प्रल्हाद जोशींना माहित नाही. प्रल्हाद जोशी हे केवळ एका साईड ऍक्टर प्रमाणे आहेत अशी खिल्ली सिद्धरामय्यांनी उडविली.
बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली असून प्रल्हाद जोशी यांच्यासह भाजपावरदेखील त्यांनी जोरदार निशाणा साधला. येडियुरप्पा सरकार हे वेड्यांचे सरकार आहे.
बेळगावच्या पोटनिवडणुकीत भाजपाला जनता योग्य धडा शिकवेल. केंद्रात असलेले मोदी सरकार हे देशाला देशोधडीला घेऊन जात आहे. गरीब, शेतकऱ्यांना या देशात निभावणे शक्य नाही. इंधन दरवाढ, महागाई याने हैराण केले आहे. केंद्र सरकार आणि कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार हे अपयशी असल्याची टीका सिध्दरामय्यांनी केली.
केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांमुळे कर्नाटकात भाजप सरकार निवडून येणे कठीण आहे. केंद्रीय मंत्री हे भाजपचे गुलाम आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली. लोकशाही व्यवस्था असूनही रमेश जारकीहोळी समर्थक गुंडगिरी करत आहेत. गुंडगिरी करणे योग्य नाही.
लोकशाही विरोधात रमेश जारकीहोळी समर्थक बेळगावमध्ये दहशत माजवीत असल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले. सीडीप्रकरणातील संबंधित युवतीने आपल्याला संरक्षण मिळावे, यासाठी निवेदन दिले आहे.
परंतु संरक्षण देण्यासाठी मी सरकारमध्ये नाही. ज्यांचे सरकार आहे, त्यांच्याशी चर्चा करून सहकार्य करेन, असे युवतीला सांगण्यात आले, आहे असे सिद्धरामय्यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले.