बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे अखेर प्रदेश कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यावयाची यावर बराच विचार विमर्श झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सतीश जारकीहोळी यांच्या नांवावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर आज सकाळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांच्याकडे सादर केला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव मतदार संघातील जनतेच्या समस्या दूर करून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे सांगून जनतेने आपल्याला आशीर्वाद द्यावा असे सांगितले.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे रस्ते ठिकाणी बॅरिकेड्स टाकून अडविण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येकाची चौकशी आणि तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे.