बेळगावच्या प्यास फाऊंडेशनने हाती घेतलेल्या मण्णीकेरी तलाव प्रकल्पाला यश आले असून जिवंत झरे लागल्यामुळे हा तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे.
पाणी संवर्धनाच्या कामाला वाहून घेतलेल्या शहरातील प्यास फाउंडेशनने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन मागील महिन्यात मण्णीकेरी (ता. बेळगाव) येथील तलावाचे खुदाईद्वारे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले होते.
सदर तलाव खुदाईप्रसंगी जमिनीतून अचानक उडालेल्या स्वच्छ ताज्या पाण्याच्या फवाऱ्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. सध्याच्या ऐन उन्हाळ्यात या पद्धतीने तलावामध्ये दोन जिवंत झरे लागल्यामुळे अवघ्या तासाभरात मण्णीकेरी तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे.
आपल्या प्रयत्नांना भूमातेने अशा पद्धतीने आशीर्वाद देऊन यश मिळवून दिल्यामुळे प्यास फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. जागतिक जल दिनानिमित्त प्यास फाउंडेशनला मिळालेली ही एक उत्तम भेटच म्हणावी लागेल.