कर्नाटकातील बहुचर्चित आय एम ए घोटाळ्यातील ठेवीदारांना पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घोटाळ्यात गुंतलेल्या व्यक्ती आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर बेळगावात घोटाळा करून कोट्यवधींच्या ठेवीचा घोळ केलेल्या संगोळी रायन्ना सोसायटीतील पैसे कधी परत मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आय एम ए मध्ये पैसे गुंतविलेल्या 65 हजार ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आहे. सरकारने 475 कोटींच्या मालमत्ता जोडून घेतल्या आहेत तर 6.5 कोटींच्या ठेवी परत देण्याच्या बाबतीत विशेष न्यायालयाने प्रयत्न केले आहेत. याच पद्धतीने संगोळी सोसायटीच्या बाबतीतही कार्यवाही व्हावी अशी ठेविदारांची मागणी आहे.
सप्टेंबर 2017 मध्ये संगोळी रायन्ना सोसायटीचा घोटाळा उघड झाला. शेकडो ठेविदारानी तक्रारी दाखल केल्यानंतर पोलीस खात्याने तपास सुरू केला. सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ फरार झाला होता. पोलिसांनी त्याला मुंबईत अटक करून बेळगावला आणले. 18 सप्टेंबर 2017 रोजी ही कारवाई झाली होती.
सप्टेंबर 2020 मध्ये ईडी ने आनंद अप्पूगोळ आणि इतरांच्या नावे असलेल्या 31.35 कोटींच्या मालमत्ता जोडून घेतल्या आहेत.खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून पोलिसांनी 40 लाखाच्या मालमत्ता जप्त केल्या असून त्यामध्ये कार, बाईक्स व इतर वस्तूंचा समावेश आहे.
ईडी ने अप्पूगोळ च्या जोडलेल्या मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. आय एम ए घोटाळा 2019 ला उजेडात आला आणि आता ठेवीदारांना दिलासाही मिळत आहे. त्यापूर्वी दोन वर्षे आधी झालेल्या संगोळी सोसायटीच्या घोटाळ्यातही हाच न्याय मिळावा ही मागणी पुढे आली आहे.