कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कोविड तांत्रिक समितीने वर्तविली होती. कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात येतील, अशी अफवा अनेक ठिकाणी पसरली होती. परंतु या अफवा बाजूला सारत शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात ग्रीन सिग्नल दिला आहे.
१५ जुलै पासून पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होईल, असे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली असून कोरोनाची दुसरी लाट येत असली तरी शैक्षणिक वर्ष वेळेतच सुरु होईल, असे स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रमात भगवद्गीतेवरील पाठयक्रम सुरु करण्यासाठी मागणी होत आहे.
या मागणीला अनुसरून शैक्षणिक पाठपुस्तकांमध्ये भगवद्गीतेवरील अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार करण्यात येत असून लवकरच भगवद्गीता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात निर्धार करण्यात येत असल्याचेही सुरेश कुमारांनी स्पष्ट केले.
मार्च १ पासून पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा सरकारचा विचार होता. परंतु सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा निर्णय सध्या स्थगित करण्यात आला आहे. शिवाय पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु करू नयेत असे अभिप्राय देखील आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही खाजगी शाळांमधून पहिली ते पाचवी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुरेश कुमार यांनी सांगितले.