कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडीप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना या सेक्स स्कॅण्डलसाठी जबाबदार धरले असले तरी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मात्र हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. परंतु कायदा आपले काम करील हे प्रकरण दडपू पाहणारे लोकांना समोर आणून निवेदन करण्यास भाग पाडत आहेत. सरकारने कांहीही केले तरी मी पोलिसांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे करावी व स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण करावे असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत असून पिडीतेच्या आई वडिलांनी दिलेल्या निवेदनात संदर्भात ते म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पीडितेने माध्यमांसमोरही निवेदन केले, याचा तपास झाला पाहिजे. शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एसआयटी समोर येऊन निवेदन द्यावे असे आपणास वाटते काय? यावर डी. के. शिवकुमार म्हणाले की, मला या विषयावर सध्या कांही म्हणायचे नाही. मी राज्यातील पोट निवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रदेशाध्यक्ष आणि मानहानीचा खटला दाखल करण्याच्या शक्यतेचाही त्यांनी इन्कार केला.
या प्रकरणाला शनिवारी अचानक वेगळे वळण मिळाले त्यादिवशी त्या युवतीच्या मातापित्यांनी आरोप केला की त्यांच्या मुलीचा वापर करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे घाणेरडे राजकारण करीत आहेत. आमच्या कुटुंबाचे कांही बरे वाईट झाले तर त्याला शिवकुमार जबाबदार असतील असेही ते म्हणाले होते. त्यांची मुलगी एखाद्या अज्ञातस्थळी असून काँग्रेस नेत्यांनी तिला परत पाठवावे अशी विनंतीही तिच्या आई-वडिलांसह भावाने केली होती. त्यामुळे खळबळ उडाली असून पीडितेच्या कुटुंबीयांनी हे निवेदन दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी शिवकुमार यांच्यावर टीका केली आहे. शिवकुमार यांच्या विरुद्ध राजकीय व कायदेशीर लढाई लढण्याची ही त्यांनी घोषणा केली आहे.
डी. के. शिवकुमार हे रविवारी जेंव्हा बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी रमेश जारकीहोळी यांच्या मुळे जिल्ह्यात बेळगाव येथे दाखल झाले. तेंव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मात्र त्याच वेळी माजी मंत्री व गोकाक येथील भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले व परत जा, परत जा अशी नारेबाजी केली. दरम्यान पीडितेचे वकील जगदिश यांनी सांगितले की, आपला जबाब नोंदवण्यासाठी संबंधित युवती सोमवारी न्यायालयात हजर होऊ शकते
*जबाब नोंदवण्याची भीती वाटते : पीडिता*
शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एक व्हिडिओ जारी करून म्हटले होते की तिचे आई-वडील कोणाच्यातरी दबावाखाली येऊन बोलत आहेत. हे सर्व पाहून मला एसआयटीसमोर हजर होऊन जबाब देण्याची भीती वाटते. मला न्यायाधीशांसमोर उभे करून जबाब नोंदवण्यासाठी मदत करावी असेही तिने म्हंटले होते.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, व्हिडिओ, ऑडिओ व सीडीची शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून या सीडी प्रकरणाचे सत्य बाहेर आणण्याचे आणि पिडीतेच्या संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले असून पाच नोटिसा बजावल्या आहेत. तसेच तिच्या आई-वडिलांनाही सुरक्षा दिली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.