राज्यात गाजत असलेल्या वादग्रस्त अश्लील सीडी प्रकरणासंदर्भात कब्बन पार्क पोलिसांनी भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांना आज सोमवारी सकाळी सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी त्यांना एसआयटी आवारातील तांत्रिक युनिटमध्ये येऊन विचारणेसाठी हजर राहण्याचा सल्ला दिला आहे.
अश्लील सीडीप्रकरणी रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या युवतीच्या पालकांनी सीडी प्रकरणाबाबत पोलीस स्टेशन स्थानकात तक्रार दिली असून याप्रकरणी आणखी दोघा जणांना नोटीस बजावण्यात आले आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या नरेश गौडाच्या पत्नीसह संशयीत चेतन यालाही एसआयटीने नोटीस बजावली आहे. उद्या सकाळी 10 वाजता एसआयटीच्या तांत्रीक विभागात हजर राहण्याची ही नोटीस आहे. दरम्यान आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात सीडीतील युवतीने एक व्हिडिओ जारी करुन प्रकरणाला नवे वळण दिले आहे. संबंधित युवती उद्या बेंगलोर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या युवतीने पूर्वी न्यायाधिशांसमोर हजर राहण्याचे म्हंटले होते. या युवतीच्यावतीने पोलिसात तक्रार दाखल करणारे बेंगलोरचे वकील ॲड. जगदीश यांनी सहकारी नगरातील त्यांच्या कार्यालयात वकिलांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवती आज सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास शहरात येणार आहे. सीडीप्रकरणी काय काय घडामोडी घडतात किंवा घडणार आहेत याचा अंदाज घेऊन त्या युवतीला आणले जाण्याची शक्यता आहे.