मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका गवळ्याच्या 9 म्हशी आणि एक रेडा अशी एकूण दहा जनावरे दोन दिवसात दगावल्यामुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित गवळ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर जनावरांच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
मंगळवार पेठ टिळकवाडी येथील पिराजी चौधरी (गवळी) हे पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या गोठ्यातील 7 म्हशी सोमवारी अचानक दगावल्या. याबाबतची माहिती मिळताच पशु संगोपन खात्याच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोठ्याला भेट देऊन मृत जनावरांची शवचिकित्सा केली.
त्यावेळी चौधरी यांनी आपल्या म्हशी कशामुळे दगावल्या? अशी विचारणा मृत म्हशींची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना केली असता आम्हाला निश्चित कारण समजलेले नाही. बहुदा फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असे त्यांनी सांगितले. तसेच शवचिकित्सेचा अहवाल हाती आल्यानंतरच निश्चित कारण स्पष्ट होईल, असे स्पष्ट केल्याचे समजते. दरम्यान शवचिकित्सेचा अहवाल येण्याआधीच काल मंगळवारी पुन्हा दोन म्हशी व एक रेडा अशी 3 जनावरे दगावली. यामुळे परिसरातील गवळी समाज बांधवांतून चिंता व्यक्त होण्याबरोबरच भितीचे वातावरण पसरले आहे.
या जनावरांना नेमका कोणता आजार झाला? याबाबतची माहिती अद्यापही स्पष्ट करण्यात आलेली नाही. सध्या मंगळवार पेठ येथील आणखी कांही जनावरे आजारी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पशु संगोपन खात्याच्यावतीने आजारी जनावरांना केवळ सलाईन व इंजेक्शन देण्यात येत आहे. पशु संगोपन खात्यातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडण्याचा हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला जात आहे.
चांगल्या जातीच्या दुभत्या 9 म्हशी आणि 1 रेडा दगावल्यामुळे पिराजी चौधरी यांचे सुमारे 11 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे दूध विक्री करून चरितार्थ चालवणाऱ्या पिराजी चौधरी (गवळी) कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यांना सरकारकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी गवळी समाजाकडून केली जात आहे.