संयुक्त किसान मोर्चा दिल्ली, कर्नाटक राज्य रयत शेतकरी संघ आणि सर्व शेतकरी संघटनांतर्फे उद्या बुधवार दि 31 मार्च 2021 रोजी दुपारी 2 वाजता बेळगाव येथे भव्य शेतकरी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील क्लब रोडवरील सीपीएड कॉलेज मैदानावर ही महासभा होणार आहे. सदर महासभेत कृषी संबंधित केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे मागे घेण्यात यावेत, कृषी उत्पादनांना किमान हमीभाव मिळावा, सर्व शेतकऱ्यांना नियमीत भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा,
भूसंपादनासाठी कर्नाटक सरकारने केलेले कायदे रद्द करावेत, राष्ट्रीयीकृत उद्योगांचे खाजगीकरण त्वरित थांबविण्यात यावे, शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, बेळगाव सभोवताल होणारा रिंगरोड रद्द करून सुपीक शेतजमीन वाचवावी, सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था बळकट करण्यात यावी, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत आदी मागण्या या महासभेमध्ये मांडल्या जाणार आहेत.
तरी बेळगाव शहर आणि जिल्ह्यासह सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या महासभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्नाटकातील शेतकरी नेते आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.