बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प संदर्भात निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत भूसंपादन व इतर विषयांवर विशेष चर्चा झाली तर आपली जमीन देणार नाही असे सांगून शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीतून शेतकरी प्रतिनिधींना बाहेर काढण्यात आले यामुळे समस्त शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. बेळगाव महानगरपालिकेने यापूर्वी अलारवाड येथे याच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेले असताना पुन्हा येथील जागा लाटण्याचा प्रकार सुरू आहे याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत. शेतकरी नेते नारायण सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद यांना सुद्धा या बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र ऐनवेळी त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. ज्यांची जमीन आहे त्यांनी तेवढेच बसा असे सांगण्यात आले यामुळे आपल्या प्रतिनिधींना डावलल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये दिसून आली.
बेळगाव शहर महानगरपालिकेने सतरा एकर ३० गुंठे जमिनीत हलगा येथील सुवर्ण विधानसौध च्या जवळ हा प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. २१ शेतकऱ्यांनी याविरोधात लढा पुकारला असून ते न्यायालयात गेलेले आहेत यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक बोलावली होती. याप्रसंगी या प्रकल्पासाठी खासबाग येथील जमिनीचाही विचार व्हावा असे या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी जर आपली सुपीक जमीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी घेण्यात आली तर सामुदायिक आत्महत्या करू असा इशारा दिला आहे.
आम्ही कोणत्याही पद्धतीने जमीन देण्यास तयार नाही अशी माहिती शेतकरी सुकुमार बेलद, सुरेश साबणावर आणि देवेंद्र बाळेकुंद्री यांनी बैठकीत दिली. भूसंपादन करताना योग्य कार्यवाही केलेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी या बैठकीत केला. अलारवाड येथे यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च झालेले असताना पुन्हा येथील जमीन कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्याने विचारल्यावर महानगरपालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी अलारवाड ही जागा योग्य नसून तांत्रिक कारणासाठी आम्ही हलग्या ची निवड केलेली आहे. भूसंपादनाची सारी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता ती शेतकऱ्यांना परत देणे कठीण आहे अशी माहिती दिली.