युवक ही देशाची संपत्ती आहे तशीच ती प्रत्येक घराची गावाची आणि लढ्याची संपत्ती आहे असे म्हणावे लागेल. बेळगाव आणि भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये कार्यरत युवकांनी नुकतेच हे दाखवून दिले. ज्येष्ठ नेत्यांमधील फुटीच्या धोरणाने विधानसभा निवडणुकीत मराठी माणूस आणि समितीला प्रभाव सोसावा लागला तसेच एकूणच जी काही मरगळ आली होती ती मरगळ युवकांनी युवा समितीच्या माध्यमातून झटकण्याचा प्रयत्न केला.
मुंबईच्या आझाद मैदानावर एकदिवसीय उपोषण ठेऊन गुरुवारी पुन्हा एकदा या युवकांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सीमाभागाकडे वेधून घेतले. ही काही साधी कामगिरी नाही. जो महाराष्ट्र गुरुवारी मराठा आरक्षणावरून गाजत होता त्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसजी यांना बेळगावच्या तरुणांना भेटावे लागले आणि त्यांनी युवकांच्या महाराष्ट्रकडून असलेल्या मागण्या समजावून घेतल्या. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देऊ, उच्चाधिकार आणि तज्ञ समितीच्या बैठका घेऊ तसेच जो काही समन्वय साधायचा राहिला आहे तो साधून यापुढे सीमाभागाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहू असे बेळगावच्या युवकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलायला लावले हे ही नसे थोडके.
आता या युवकांनी म्हणजे ते भले युवा समितीचे कार्यकर्ते असोत, पाईक असोत, दबाव गट असो वा युुवा मंच युवा मोर्चा किंव्हा कुठल्या गटाचे असोत कामाला लागलेच पाहिजे. मराठी शाळा, मराठी फलक, कागदपत्रे यावर लढाई झाली आहे ती होत राहिली पाहिजे. नवीन तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी सायबर जागृती झाली पाहिजे. फक्त काळयादिनी नव्हे तर समितीच्या प्रत्येक आंदोलनात युवक मोठ्या संख्येने दिसला पाहिजे. लढ्यात दिसताना सीमाप्रश्न आणि सीमाभाग याची संपूर्ण माहिती तरुणांनी करून घेतली पाहिजे. फक्त बेळगाव शहर आणि खानापूर शहर तसेच दोन्ही तालुके यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सीमाभागातील तरुण एकवटला पाहिजे. हे होण्यासाठी ज्येष्ठ म्हणून घेणाऱ्या सर्व नेत्यांनी या युवकांना प्रोत्साहन आणि पाठींबा दिला पाहिजे ही गरज आहे.
विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांचे वाद आणि मतभेद पाहून युवकांची अवस्था वाईट झाली होती. तरीही ते कामाला लागले आहेत, पण त्यांना ज्येष्ठांचा म्हणावा तेवढा पाठींबा दिसत नाही. मध्यवर्ती वाले, ती बरखास्त करा म्हणणारे आणि मधले म्हणजेच इकडेही आणि तिकडेही तुणतुणे वाजवणारे अश्या सर्वांनी जर या युवकांना पाठबळ दिले तर फार मोठे काम होऊन जाईल. ६३ वर्षांच्या सीमाप्रश्नाच्या लढाईत फक्त म्हातारे कोतारे राहिले आणि युवक दूर गेले असे सांगणाऱ्याना आता युवकांचा सहभाग पाहून आपली तोंडे झाकून घ्यावी लागली आहेत. या युवकांची संख्या कायम ठेवून ती वाढवण्यावर भर देणे हीच सीमाप्रश्नातील जमेची बाजू ठरू शकणार आहे. त्यासाठी नेत्यांनी आपण पाठीशी राहून युवकांना लढायला पुढे करणे आणि त्यांना पाठींबा देणे गरजेचे वाटते.
नुकतीच युवकांच्या दबाव गटाने मध्यवर्ती समितीची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. निष्क्रियता कधीही वाईट असते या न्यायाने नवीन नेतृत्वाना संधी देण्याची गरज ओळखून ही कृती लवकरात लवकर होण्याची गरज आहे. मध्यवर्ती समिती आणि सर्व घटक समित्यांमधील दुही संपवून युवकांना स्थान दिल्यास युवक पदांच्या आशेने राष्ट्रीय पक्षात जाणार नाहीत पण हे समजून सुद्धा झोपेचे सोंग घेणाऱ्या नेत्यांना काय आणि कुणी सांगावे. तेच गरज ओळखून शहाणे होतील ही अपेक्षा ठेवूया.
युवकांनो तुम्ही एक गड सर केलाय. आता पुढे अनेक गड सर करायचे आहेत. महानगरपालिका, तालुका आणि जिल्हा पंचायत, ग्राम पंचायती अशा सर्व ठिकाणी सीमाभागात मराठीचा झेंडा लावावा लागेल तेंव्हा एक होऊया आणि पुढे जाऊया.
हम होंगे कामयाब एकदिन।