बेळगाव लाईव्ह विशेष : सध्या गुळाचा हंगाम सुरु झाला आहे. बाजारात केमिकलयुक्त आणि सेंद्रिय गूळ आता उपलब्ध होऊ लागले आहेत. अलीकडे केमिकलयुक्त कोणताही पदार्थ खाणं प्रत्येकजण टाळत आहे. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला जे मिळेल त्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे.
रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे, पचनशक्ती वाढविणारे यासह विविध गुणधर्म असणारे गूळ बाजारात उपलब्ध आहेच. परंतु नैसर्गिकरित्या तयार करण्यात येत असलेला गूळ बाजारात कमी प्रमाणात मिळतो.
मात्र गेल्या ३० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रित्या गूळ बनविणारे अनेक ऊस उत्पादक आजही आपला व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळत आहेत. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील कल्लेहोळ या गावातील परशराम मरूचे हे देखील या व्यवसायात अग्रेसर आहेत.
गेल्या ३० वर्षांपासून वडिलोपार्जित सुरु असलेला गुळाचा व्यवसाय ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत. पणजोबांच्या काळापासून चालत आलेला गुळाच्या घाण्याचा व्यवसाय चालविणाऱ्या परशराम मरूचे यांनी वडिलोपार्जित व्यवसाय आत्मसात केला आहे.
फॅब्रिकेशन व्यवसाय सांभाळत आपल्या शेतातील ऊस कारखान्यांना देण्याऐवजी संपूर्ण मरूचे कुटुंब स्वतः याचे उत्पादन घेत आहेत. कामगारांची कमतरता, ऊस वाहतुकीची समस्या अशा अनेक कारणांमुळे मरूचे कुटुंब आपला व्यवसाय कोणत्याही कारणास्तव बंद पडू नये यासाठी झोकून देऊन काम करत आहे.
बाजारात केमिकलयुक्त, साखर मिश्रित गूळ उपलब्ध असतो. मात्र लोकांना चांगल्या दर्जाचा, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला गूळ उपलब्ध करून देता यावा, तसेच आपला पारंपरिक व्यवसाय जोपासता यावा, यासाठी जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गूळ बनविण्यात येत असल्याचे परशराम मरूचे यांनी सांगितले. उसाचा रस काढण्याची मशीन जुनी आहे.
परंतु याच मशीनमध्ये थोडा बदल करून, नव्या तंत्रज्ञाचा वापर करून उसाचा रस आणि त्यापासून उसापासून बनणारे विविध पदार्थ तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दररोज पहाटे ५ ते रात्री ८ यावेळेत उसाचा हंगामी व्यवसाय सुरु आहे.
दररोज ५ ते ८ टन ऊस तोडून ५ किलो, १० किलो, १ किलो अशा वजनातील गुळाची ढेप या ठिकाणी बनविण्यात येते. साधारण डिसेंबर – जानेवारीच्या काळात हा व्यवसाय तेजीत असतो, अशी माहिती परशराम मरूचे यांनी दिली.