Saturday, April 27, 2024

/

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

 belgaum

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’
नमस्कार…!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे आहे. पुस्तकं माणसाला ज्ञानी बनवतात. पुस्तकं माणसाने वाचली पाहिजेत. या दृष्टिकोनातून ‘बेळगाव लाईव्ह’ दर शनिवारी ‘शब्दशिल्प’ या सदराखाली पुस्तकाचा परिचय आपल्याला करून देत आहे. आजपासून नवं कोरं सदर ‘बेळगाव लाईव्ह’ च्या वाचकांसाठी सुरु होत आहे.

या नव्या कोऱ्या सदराच्या माध्यमातून आज विक्रम वागरे लिखित ‘सर्जन विसर्जन’ या काव्यसंग्रहाचा परिचय आपल्यासमोर सादर करीत आहोत.

अपप्रवृत्तींवर घाव आणि खऱ्याचा भाव मिरवणारा काव्यसंग्रह: सर्जन विसर्जन

 belgaum

सर्जन विसर्जन हा तरुण कवी विक्रम वागरे यांचा दमदार काव्यसंग्रह दर्या प्रकाशनकडून प्रकाशित झाला आहे. कवी मन आणि अख्खा भोवताल कवेत घेणारा हा संग्रह मुक्तछंदाइतकाच छंदबद्ध कविता घेऊन गझलच्या अंगानं हुदकतच आला आहे. साजेसं बोलकं मुखपृष्ठ घेऊन ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची मलपृष्ठावर ब्लर्ब पाठराखण लेवून मिरवत आला आहे‌. कवीच्या व्यासपीठीय कवितांनी जितकी रसिकांना भूरळ घातली तितक्याच या संग्रहातील कविताही रसिक मनाला भिडणाऱ्या आहेत‌‌.

नव्या पिढीतला हा दमदार कवी नवा साच्यातली काव्यरचना रूढ करणारा आहे. ही संपदा ताकतीने घेऊन आला आहे. राधानगरी परिसरातील बोलीभाषेतील शब्द कवेत घेऊन ४० कवितांचा हा संग्रह आला आहे. अपप्रवृत्तींचं विसर्जन करत नव्या सर्जनाला प्रेरणादायी भाव देणारा हा संग्रह चौफेर असा असून वास्तवाचा आवाका अचूक मांडणार आहे. आजचं दाहक वास्तव या कवीच्या कवी मनानं टिपलेला आहे तेही धारदार अशा शब्दांनी घाव घालत. कशाचीही तमा, फिकीर न बाळगता. सत्य बोलण्याचं धाडसी काम यासंग्रहाच्या कवीच्या कवितांनी केलं आहे.

झाडं, माणसातली हरवत चाललेली संवेदनशीलता, कवी मन, पाणी, मुलं डांबून ठेवणारी शाळा, स्वार्थ, जाती-धर्मातली दंगल, वाटून घेतलेले रंग, महापूर, स्त्रीभ्रूणहत्या, कावळे, राष्ट्रीय एकात्मता, पाऊस, ढग, माती, समता, प्रेमाचे पाश तोडून दूर जाणारी मुलं असे एकापेक्षा एक सरस काव्य बीज घेऊन आलेली ही काव्यसंपदा कविता हाच उपाय सांगते आणि उजेडाची कविता तर स्वतःसह इतरांना लख्ख वाट दावणारी अशीच वाटते. वरकरणी हा इवलासा संग्रह वाटला तरी दांडगा आवाका मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. असा हा सर्व समावेशक दमदार काव्यसंग्रह कवीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अर्पण केला आहे.

शाश्वत…या कवितेत झाडे- गीता कुराण बायबलच्याही आधीपासून होती असं सांगत झाडांचं ज्येष्ठत्व आभाळाला टेकवतो. धर्म, ग्रंथ हे सारं त्या पुढं फिकं पडतं.

माणसातली संवेदनशीलता हरवत चालली हे सांगताना ‘कनेक्शन ऑफ’ या कवितेत कवी म्हणतो, ‘डोळ्यांकडून हृदयाकडे जाणारी नस मध्येच तुटली असावी बहुतेक…..’ खरंच हे विचार करण्यासारखंच भयाण वास्तव आहे!

‘ती वीज पकडते तेव्हा… ‘ या कवितेत तिला कळलं खरंच कवीशी लग्न करणं म्हणजे वीज पकडणं असतं हे अगदी प्रामाणिकपणे वेगळ्या धाटणीतनं मांडतोच. ते अनेकांचे डोळे उघडत.Shabd shilp logo

कृतज्ञ…कवितेत शाळेत मुलांची होणारी कुचंबणा मांडली आहे. व्यवस्थेनं निव्वळ नियम, शिस्त चघळत त्यांना डांबून ठेवण्यात अर्थ नाही हेच सत्य वदते ती अशी..
आमची पोरं आजकाल
गांधीजींना शरण जाऊन
करत असतात उपोषण
दुपारच्या सुट्टीपर्यंत…

शहाणपणाची गोष्ट ही तर खूप काही सांगून जाते. वटसावित्रीची कविता ही खरी वटसावित्री डोळ्यापुढे आणून उभी करते.

ढग…हे तर अगदी अजब गजब आहेत. म्हणून तर हे इथले काव्य. ढग चुकूनही घेत नाहीत चढवून स्वतःवर लाल, भगवे, हिरवे किंवा निळेपण!
सर्जनासाठी … विसर्जनासाठी .. आभाळातून अध:पतित होऊन… असं ठासून सांगते.

‘दंगलीच्या दुसऱ्या दिवशी….’ या कवितेत सगळं स्तब्ध असताना कवी म्हणतो,
‘गटारातलं पाणी तेवढं
कुणाला न जुमानता वाहात होतं’
हे नुसतं नेमकं आणि मार्मिक भाष्यच नाही तर सद्यस्थितीला डागणी ओढणारं, चटके देणारं असंच आहे.

‘वारांगनेच्या डायरीचे शेवटचे पान….’ या पानात तिची आई तिला म्हणते,
‘माफ कर लेकी मला
स्त्रीचे शरीर
आणि माझीच मळलेली पायवाट याशिवाय काहीच देता आलं नाही तुला….
लक्षात ठेव पोरी,
आपण नसतोच कधी
कुणाच्या आत्या, मावशी, ताई किंवा माई
आपल्यासाठी असतं एकच नाव -बाई
जाता जाता एवढंच सांगते पोरी
हे सारं ऐकण्याची वेळ कधीच
तुझ्या पोरीवर येऊ देऊ नकोस!’
आपल्या वाटेला आलेली वेदना आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हे सांगणारी वारांगना आपली भयान वेदना लपवत लेकीला या बरबटलेल्या स्वार्थी जगात आपल्या पायावर
सक्षम व्हायला, उभं राहायला, निर्भर करायला प्रेरणा देते.

‘आठवून बघ…’ ही कविता ‘एकदा आपल्याला पाऊस भेटला होता… सारखी ओळ ओठांवर येते ती आपसूकच छंद बद्धता लेवूनच. पावसाच्या ही डोळ्यात असलं रूपडं घेऊनच..
ऐकताना त्याच्याही डोळ्यांत नवा पाऊस दाटला होता…’ असं म्हणत आणि तिचं जाणं तेही काळजाला टोचत.

‘आम्ही भारतीय लोक…’ ही कविता तर आम्ही रंग कसे जाती-धर्मानं वाटून घेतलेत ते कडवं सत्य सांगते. पुढं आपली राष्ट्रीय एकात्मता आत्महत्या करेल अशीही विदारक परिस्थिती सांगते.

पितृपक्षाची कविता…. ‘कावळे सदैव उपेक्षितच ही खंत मांडते. ते कावळेच असावेत आमचे पितर बहुधा..’. म्हणत.

‘मदरलँड’ची वांझोटी कविता…. ‘ स्त्रीभ्रूण हत्येवर प्रहार करते. वांझोट्या पुरुषत्वाला शड्डू ठोकून आव्हान करते.

शेतकऱ्याची दयनीय अवस्था उपरोधानं शेतकरी कधीच करत नाही आत्महत्या….. मध्ये येते.

अत्तर, शोधतो आहे, समतेचे सुक्त, पळस, आज सकाळी पुन्हा, येशी कधी, आशेचा प्रकाश नाही या कविता गझल अंगाने खूप काही पेरून जातात. आशेचा प्रकाश नाही हे सांगताना कवी म्हणतो,
‘लांडग्यांचे राज्य आले लांडगेच माजले
कुठेच सिंहगर्जनेचा कोणताच भास नाही’

कलियुग…. ‘कलियुगात सगळं उलटच घडतंय आराजगता माजली आहे हे ठासून सांगते. खऱ्याचं खोटं नि लबाडाचं गाल मोठं कसं झालेत हे सांगते. वासनांधता, दुकानदारी हे दाखवते ते.’
..गवळणीच्या मालाला
कवडीचे मोल
मथुरेच्या हायवेवर
पेंद्याचा टोल.‌..
हे असं म्हणत.
उजेडाची कविता….
कविता तर स्वतःला लख्ख वाट दावणारी अशीच आहे.

आदिम दुःखांसाठी कुठली दवा ना दारू
ओले काळीज आणि कविता हाच उपाय…
अशी विक्रमची कविताच मनातून ठासून सांगते. एकंदरीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वांगाना स्पर्श करत पटेल ते उजेडात आणत नको ते गाडत पुढे झालेला हा काव्यसंग्रह वाचनीय आणि चिंतनीय असाच आहे. यात उणं काढायला तशी फट, जागा न ठेवलेल्या नाहीतच म्हणूनच अशा या दमदार काव्यसंग्रहाबद्दल कवीचं अभिनंदन आणि पुढच्या साहित्य प्रवासाला अनंत शुभेच्छा….

-पुस्तक परिचय: रवींद्र गुरव

सर्जन विसर्जन
(काव्यसंग्रह)
कवी- विक्रम वागरे.
भ्रमणध्वनी- ७५८८०६५२८९
प्रकाशन- दर्या प्रकाशन, पुणे.
पृष्ठे- ७४
मूल्य- १२०₹

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.