बेळगाव लाईव्ह :नैऋत्य रेल्वेने जवळपास वर्षभरापूर्वी वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसचे स्वरूप पालटताना अवघ्या दोन नॉन एसी स्लीपर कोचिस ठेवून एसी कोचिसची संख्या वाढविली आहे. परिणामी अवघ्या दोन डब्यातून प्रवाशांना दाटीवाटीने बेळगाव – दिल्ली दरम्यानचा जीवघेणा प्रवास करावा आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन गोवा एक्सप्रेसच्या नॉन एसी कोचेसी संख्या वाढवून पूर्वीप्रमाणे 9 करावी अशी जोरदार मागणी होत आहे.
गेल्या जवळपास वर्षभरापासून वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला फक्त दोन स्लीपर कोचीस असून उर्वरित सर्व डबे वातानुकूलित एलएचबी एसी कोचीस आहेत. प्रवाशांचा बेळगाव ते दिल्ली रेल्वे प्रवास आरामदायक व्हावा हा या मागचा उद्देश असला तरी यामुळे गोवा ते बेळगावपर्यंत मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय झाला आहे.
सदर प्रकारामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह कायम बेळगाव -गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या विशेष करून कामगारवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी गोवा एक्सप्रेसला नॉन एसी स्लीपर कोचीसची संख्या 8 -9 इतकी जास्त होती. गोवा एक्सप्रेसमुळे त्यावेळी कामगार वर्गासह सर्वसामान्य गरीब प्रवाशांचा बेळगाव -गोवा मधील लांबचा रेल्वे प्रवास सोयीस्कर, आरामदायी आणि खिशाला परवडणारा होत होता. मात्र साधारण वर्षभरापासून गोवा एक्सप्रेसच्या नॉन एसी स्लीपर कोचीसची संख्या नगण्य करून महागड्या एसी कोचीसची संख्या वाढवण्यात आली आहे.
सध्या या रेल्वेला फक्त दोनच नॉन एसी स्लीपर कोचीस असून उर्वरित सर्व वातानुकूलित एसी कोचीस आहेत. परिणामी एसी कोचिसचे दर परवडणारा नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी आणि कामगारवर्गाची स्लीपर कोचिंसमध्ये एकच गर्दी होत आहे. त्यामुळे स्थानकावरून रेल्वे सुटताना देखील तुडुंब भरलेल्या डब्यात दाटी-वाटीने प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची जीवघेणी चढाओढ सुरू असल्याचे चित्र गोवा एक्सप्रेसच्या बाबतीत अलीकडे नित्याचे झाले आहे. या पद्धतीने चालत्या रेल्वेमध्ये प्रवेश करण्याचा प्रकार जीवावर बेतणारा ठरू शकतो.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून गोवा एक्सप्रेसच्या नॉन एसी कोचेसची संख्या पूर्वीप्रमाणे वाढ व्हावी अशी सातत्याने मागणी केली जात आहे. बेळगाव लाईव्हने देखील 26 जून 2023 रोजी त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. तथापी आजतागायत नैऋत्य रेल्वे खात्याकडून प्रवाशांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या हरिप्रिया एक्सप्रेस, चन्नम्मा एक्सप्रेस आणि बेळगावहून सायंकाळी निघणाऱ्या अंगडी एक्सप्रेस रेल्वेला देखील एलएचबी कोचीस आणि 10 -10 नॉन एसी स्लीपर कोचीस आहेत.
तशा स्लीपर कोचीस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असलेल्या गोवा एक्सप्रेसला का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? का प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे? असा संतप्त सवाल जागरूक नागरिकांकडून केला जात आहे.
बेळगाव -बेंगलोर एक्सप्रेस रेल्वे अर्थात अंगडी एक्सप्रेसला देखील एलएचबी कोचेस आहेत. मात्र त्याबरोबरच समाधानकारक संख्येत नॉन एसी कोचेस देखील आहेत. त्या पद्धतीने नैऋत्य रेल्वेने वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या नॉन एसी स्लीपर कोचेसची संख्या वाढवून ती पूर्वीप्रमाणे 9 करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.