Saturday, December 7, 2024

/

‘त्या’ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा -बेळगाव बार असो.ची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :संकेश्वर येथील वकील ॲड. सागर पांडुरंग माने यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई केली जावी. त्याचप्रमाणे संकेश्वर पोलीस अधिकाऱ्यांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.

बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्य वकिलांनी आज बुधवारी सकाळी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. संकेश्वर बार असोसिएशनचे संयुक्त सचिव वकील ॲड. सागर पांडुरंग माने यांच्यावर सोलापूर (ता हुक्केरी) गावात गेल्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी काही समाजकंटक आणि हल्ला केला. यासंदर्भात संकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून देखील आरोपीं विरुद्ध कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार घटना घडलेल्या दिवशीच पकडलेल्या आरोपींना पोलिसांनी सोडून दिले. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर पकडलेल्या आरोपीला सोडायचे की नाही याचा निर्णय न्यायालय घेते पोलिसांना तो अधिकार नसतो. मात्र तरीही हल्ला करणाऱ्या आरोपींना सोडून देण्यात आले. यावरून संकेश्वर पोलिसांनी कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. त्याऐवजी ते आरोपींच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. यावरून पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावण्यात संपूर्ण अपयशी झाल्याचे दिसून येते याचा बेळगाव बार असोसिएशन तीव्र शब्दात निषेध करते.Advocates

अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे आजकाल वकिलांचा जीव सुरक्षित नाही. सरकार राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरत असून ज्याचे परिवर्तन अधर्मात होत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे. तरी ॲड. सागर माने यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलेल्या संकेश्वर पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी ही विनंती अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण म्हणाले की, संकेश्वर बार असोसिएशनचे संयुक्त सचिव वकील ॲड. सागर माने यांच्यावर गेल्या 11 फेब्रुवारी रोजी सोलापूर या त्यांच्या गावी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ॲड. माने गंभीरित्या जखमी झाले आहेत. तेव्हा ज्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या लोकांवर सक्त कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे.

अलीकडच्या काळात वकिलांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यावरून प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे हे स्पष्ट होते. आज कोणीही येतो आणि वकिलांवर हल्ला करतो. त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याबाबतीत पोलीस आणि सरकार पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. तरी याप्रकरणी लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे अशी माहिती देऊन अलीकडेच वकील संरक्षण कायदा मंजूर झाला असला तरी वकिलांना म्हणावे तसे संरक्षण मिळत नाही आहे. त्यामुळे सदर कायदा फक्त कागदपत्रेच आहे का? असा प्रश्न पडतो असे ॲड. चव्हाण शेवटी खेदाने म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.