बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील श्री होळी कामण्णा मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा आज भाविकांच्या अपूर्व उत्साहात पार पडला.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजीनगर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री होळी कामण्णा मंदिराच्या वास्तुशांती, कळसारोहण सोहळ्याचे औचित्य साधून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुरणपोळीचा प्रसाद हे या महाप्रसादाचे वैशिष्ट्य होते.
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर आणि कुटुंबीय तसेच या परिसरातील दानशूर व्यक्ती आणि स्थानिकांच्या पुढाकारातून या महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजीनगर भागातील होळी कामण्णा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. सुमारे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा भाविकांनी व्यक्त केली होती. मात्र काही कारणांमुळे आजतागायत जीर्णोद्धाराचे काम रखडलेले होते.
नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या पुढाकारातून तसेच दानशूर व्यक्तिमत्व आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यातून यंदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून जीर्णोद्धाराच्या औचित्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.
मिरवणूक, वास्तुशांती, होम, कळसारोहण आणि प्राणप्रतिष्ठापना अशा स्वरूपात आयोजिण्यात आलेला या सोहळ्याची महाप्रसादाने आज सांगता झाली. सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला.