बेळगाव लाईव्ह :कोटक म्युच्युअल फंडतर्फे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) सहकार्याने ‘सिखो पैसो की भाषा’ या शीर्षकाखाली शिक्षकांसाठी आयोजित गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती पुढाकार कार्यक्रम आज सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
कोटक म्युच्युअल फंडातर्फे समाजात आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि शिक्षकांमधील आर्थिक समज वृद्धिंगत व्हावी. तसेच भारताच्या प्रगतशील भविष्यात योगदान देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावच्या 525 शिक्षकांसह राज्यातील सुमारे 6000 सीबीएसई शिक्षकांना आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत शिक्षित करून जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राज्यभरात राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोटक म्युच्युअल फंडने सेंटर ऑफ इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग (सीआयईएल) या संस्थेकडून 500 कुशल प्रशिक्षक मागविले आहेत. जे प्रभावी सत्रे घेण्याबरोबरच संपूर्ण कार्यक्रमादरम्यान गुणवत्ता आणि प्रासंगिकता याला प्राधान्य राहील याची काळजी घेतील.
शहरात आज आयोजित गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती पुढाकार कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना ई. एम. स्कूल गोडचीचे मुख्याध्यापक वीरभद्रेश्वर यांनी सदर कार्यक्रम आमच्या शिक्षकांना आर्थिक शिक्षण घेण्यासाठी अतिशय उपयोगी पडेल. तसेच सुरक्षित भविष्यासाठी योग्य आर्थिक गुंतवणुकीची निवड करण्यात शिक्षकांना मदत करेल असे सांगितले.
कोटक म्युच्युअल फंडचे डिजिटल व्यवसाय, विक्री आणि विश्लेषक प्रमुख किंजल शाह यांनी सिखो पैसो की भाषा या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक सक्षमीकरण जोपासण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे सांगितले. देशाच्या नशिबाला आकार देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका निभावतात आणि नवी पिढी घडवतात यावर आमचा विश्वास आहे.
त्यासाठीच आम्ही सीबीएसईच्या सहकार्याने शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकी बाबत जागृती निर्माण करत आहोत. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या जागृत शिक्षक देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करू शकतील, असे शाह म्हणाले.