Friday, January 3, 2025

/

अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे ‘असे हे’ मान्यवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवारी 18 फेब्रुवारी रोजी आयोजित पाचव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाला मान्यवर व्यक्तींसह नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार असून त्यांचा परिचय खालील प्रमाणे आहे.

संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत : मूळचे निकमवाडी ता पन्हाळा जि कोल्हापूर सध्या बाळासाहेब इंगवले पार्क फुलेवाडी कोल्हापूर येथील रहिवासी कृष्णात खोत हे कळे वि. म. व ज्युनि. कॉलेज कळे, पन्हाळा येथे सेवा बजावतात. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झड -झिंबड, धूळमाती, रिंगाण, रौंदाळा व रिंगण यांचा कन्नड अनुवाद, रिंगणाचा इंग्रजी अनुवाद या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.

तसेच ‘नांगरल्याविण भुई’ हा त्यांचा ललित गद्य संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. नुकताच त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या गावठाण या कादंबरीला अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्कार मिळाला असून ही कादंबरी मुंबई, सोलापूर, जळगाव आणि बेळगाव विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. रौंदाळा, झड -झिंबड व धूळमाती या त्यांच्या अन्य कादंबऱ्यांना देखील वि. स. खांडेकर पुरस्कार, शाहू पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार बाबुराव बागुल पुरस्कार, मधुश्री पुरस्कार, ह. ना. आपटे राज्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) ललित ग्रंथ पुरस्कार वगैरे विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. कृष्णात खोत यांनी आजपर्यंत चिंचवड, बिसूर, कडोली (बेळगाव), बलवडी, सावळज, त्रिवेणी साहित्य संमेलन उत्तूर इत्यादी ग्रामीण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळ व झड -झिंबड या कादंबरीवर अनेक विद्यार्थ्यांनी एमफील. पीएचडी केली आहे.Sahitya

शिवव्याख्याते डॉ. गणेश राऊत : इतिहास विषयात कारकीर्द असणाऱ्या डॉ. गणेश राऊत यांनी 1993 मध्ये इतिहास विषय घेऊन एम.ए आणि 2000 मध्ये एमफील पूर्ण केले. पुढे 2012 मध्ये इतिहास विषयात पीएचडी प्राप्त केली. 1994 साली हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात दाखल झालेले राऊत सध्या या महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 30 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि प्रभारी प्राचार्य म्हणून 2 वर्षांचा अनुभव आहे.

इतिहास अभ्यासक असलेल्या डॉ. गणेश राऊत यांनी इतिहासाचे 9 संदर्भग्रंथ लिहिले आहेत. तसेच 16 पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. ते स्वतः एक मुक्त पत्रकार असून ‘पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत. पुणे विद्यापीठातील पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमसीजे) ते मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांनी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. देसाई महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रचे (सीईसी) ते समन्वयक होते. डाॅ. गणेश राऊत हे बालभारतीच्या अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या विविध इयत्तांचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांनी महाराष्ट्रभर विविध विषयांवर 1500हून अधिक व्याख्याने दिली आहेत. डायमंड प्रकाशन आणि ब्लू बर्ड प्रकाशन येथे त्यांनी संपादक म्हणून काम केले आहे. पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या “दत्तक गावांचा इतिहास” या ग्रंथाच्या दोन खंडांचे संकलन व संपादन डाॅ. राऊत यांनी केले आहे. मुक्त साहित्यिक म्हणून त्यांचे एक हजाराहून अधिक लेख विविध दैनिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. ते तीन दिवाळी मासिक विशेषांकाचे मुख्य संपादक आहेत. सामाजिक उपक्रमांची उत्तम असलेले डॉ. गणेश राऊत ‘दिशा डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे’चे संस्थापक-विश्वस्त आहेत. त्यांनी इतिहासाच्या अभ्यासासाठी लंडन आणि दुबई या शहरांना भेट दिली आहे.

अनिल पवार : हे सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इतिहास, दुर्गसंवर्धन, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, सहकार, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच भरीव काम सुरू आहे. 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यभरात साजरा व्हावा यासाठी अनिल पवारांनी प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यशही आहे. त्याचाच पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी संकलित केलेलं “शिवराज्याभिषेक” हा ग्रंथ होय.

चेतन कोळी : हे अनुवादक, संपादक आणि प्रकाशक म्हणून गेली 15 वर्षे कार्यरत आहेत. आजवर त्यांच्या कारकीर्दीत जवळपास 300 ग्रंथ प्रकाशित झाले असून शिवराज्याभिषेक ग्रंथाचे ते सहाय्यक संपादक आणि निर्मिती संयोजक आहेत.

उद्घाटक उद्योजक आप्पासाहेब गुरव : बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून आप्पासाहेब गुरव सर्वांना सुपरिचित आहेत. सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रात त्यांचा एक वेगळाच ठसा आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक नागरी समस्या , शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक गरीब गरजू मुलांना ते सढळ हस्ते मदत करत असतात. संघ-संघटनांची मोट बांधण्यात त्यांचा हातखंडा आहे. औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय असल्यामुळे त्यांचे कारखानदार व कामगार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. एक हरहुन्नरी तसेच राजकिय इच्छाशक्ती असून जनतेची सेवा करण्याचा त्यांचा मानस असलेले व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते मराठा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी सुभाषचंद्रनगर नागरी संघटनेचे अध्यक्षपद तसेच लायन्स क्लब ऑफ बेळगावचे
अध्यक्षपद भूषविले आहे. याकाळात नेत्र चिकित्सा शिबिर भरून 64 लोकांच्या मोफत शस्त्रकिया करवल्या आहेत. तसेच बेळगाव फॉड्री क्लस्टर, बेळगाव जिल्हा हॉकी संघटना, बेळगाव जिल्हा शरिरसौष्ठव संघटना व बेळगाव कोल ॲन्ड कोक असोशिएशनचे ते सदस्य आहेत. गरजूंना मदत तसेच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणाऱ्या आप्पासाहेब गुरव यांनी बेळगाव शहरात पहिल्यांदा जिजाऊ जयंती साजरी करण्याचा संकल्प यशस्वी केला आहे. चंदगड, कोवाड भागातील पुरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली आहे. मराठी भाषा , संस्कृती जतन करण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. ते महाराष्ट्र एकिकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रत्येक कार्यात व लढ्यात सहभागी असतात. उद्याचे साहित्य संमेलन भरविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.

लोक कलावंत व मुख्याध्यापक नेताजी दत्तात्रय डोंगळे : मूळचे घोटावडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील रहिवासी असलेले नेताजी डोंगळे शाहूनगर (परिते) ता. राधानगरी येथील भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्यांना अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासह राष्ट्रीय साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. स्पीड न्यूज लाईव्ह 24 तास या टीव्ही चॅनलच्यावतीने त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतानाच वासुदेव, पिंगळा जोशी, कडकलक्ष्मी, वेडी, बुरगुंडा, विंचू चावला, भागाबाई, एडका इत्यादी भारुडा मधून ते सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतात.

स्वागताध्यक्ष शिवसंत संजयजी मोरे : मोरे हे शिव संत पुरस्काराने सन्मानित आहेत. बेळगाव येथे व्यक्तिगत व्यवसायाच्या ठिकाणी स्वखर्चाने गेली 27 वर्ष ते शिवजयंती उत्सव आणि शिव व्याख्यानांचे आयोजन करतात. शिव जागरासाठी त्यांनी 3000 हून अधिक शिवप्रतिमा भेटीदाखल दिले आहेत. दरवर्षी ते आपल्या कर्मचारी व मित्रपरिवाराला गड किल्ले दर्शन घडवतात. शिवसंत संजयजी मोरे याना राजा शिवछत्रपती पारगड पुरस्कार व गणेश फेस्टिवल बेळगाव उद्योग रत्न पुरस्कार मिळाले आहेत.

गेल्या जानेवारी 2023 मध्ये अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत हरियाणा आयोजित शौर्य दिन समारोहात त्यांना खास सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक दिवस गावासाठी’ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार असतो. शिवसंत मोरे हे व्यवसाय संचालक यश ऑटो कॉलेज रोड व गणेशपुर येथे दुचाकी इलेक्ट्रिक स्कूटर वितरक, त्याचप्रमाणे ‘शिवसंदेश भारत’ चे संस्थापक व मार्गदर्शक आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.