बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीनंतर बेळगाव जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराबाबत अनेक राजकीय चर्चांना ऊत आला होता.
आगामी लोकसभा निवडणूक जगदीश शेट्टर हे भाजपमधून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आज जगदीश शेट्टर यांनी आपल्या उमेदवारीबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. बेळगावमधून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आपला विचार नसून हि अफवा असल्याचे जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली येथील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झालेल्या शेट्टर यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्यानंतर शेट्टर यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
जगदीश शेट्टर यांनी घरवापसी केल्यानंतर बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते बदलली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांचे जवळचे संबंध असल्याने या दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपले नाव पुढे येत असल्याची चर्चा होती. मात्र हि चर्चा कोणत्या उद्देशाने पुढे आली हे आपल्याला माहित नसून आज होणाऱ्या बैठकीत देखील उमेदवारीसंदर्भात कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आयोजिण्यात आली असून दिल्लीतील भारत मंडपम येथे ही बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होणार आहे. याशिवाय नरेंद्र मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कामगिरीवरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह तसेच सर्व राज्यांतील खासदार आणि पक्षाचे आमदार या बैठकीत सहभागी होणार आहेत.
आज जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्या उमेदवारीसंदर्भातील चर्चेला पूर्णविराम तर मिळाला आहे. मात्र आता लोकसभेसाठी भाजप कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.