स्वस्तात सोने खरेदी करण्याचा निर्णय शहरातील एका वाईन शॉप व्यवस्थापकाच्या अंगलट आल्याची आणि भामट्याने संबंधिताला 10 लाख रुपयांना गंडवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या मोहाला फशी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला स्वस्तातील सोन्याचे आमिष दाखवून एका बिहारी युवकाने 10 लाख रुपयांना ठकल्याची घटना काल रात्री उघडकीस आली आहे.
समजलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका वाईन शॉपमध्ये नव्याने दारू पिण्यास जाणाऱ्या एका बिहारी तरूणाने अल्पावधीत वाईन शॉप व्यवस्थापकाचा विश्वास संपादन केला. आपल्याजवळ भरपूर सोने आहे तुम्हाला ते स्वस्तात द्यायची इच्छा आहे, असे सांगत त्याने व्यवस्थापकाला फशी पाडले. तसेच दुसऱ्या दिवशी दारू पिण्यासाठी आला असता सोन्याचा एक तुकडा देऊन आपल्याजवळ भरपूर सोने आहे. तेंव्हा 10 लाख रुपये तयार ठेवा. तुम्हाला अर्धा किलोहून अधिक सोने देऊ, असे त्या बिहारी युवकाने व्यवस्थापकाला सांगितले. तसेच सोने घेण्यासाठी पिरनवाडी नजीक येण्यास सांगितले.
बिहारी युवकाने दिलेला सोन्याचा तुकडा खरा निघाल्यामुळे संबंधित व्यवस्थापकाने 10 लाख रुपयांची जुळवाजुळव करून सोने खरेदीचा निर्णय घेतला. त्यानंतर पिरनवाडी येथे जाऊन त्याने 10 लाख रुपयांची पिशवी त्या बिहारी तरुणाला देऊन त्याच्याकडील सोन्याची पिशवी ताब्यात घेतली. तो तरुण पैसे घेऊन निघून जाताच व्यवस्थापकाने पिशवी उघडून पाहिले असता त्यातील सोने बनावट असल्याचे दिसून आले.
यासंबंधी उशिरापर्यंत पोलिसात फिर्याद दाखल झाली नव्हती. दरम्यान सदर घटनेनंतर तो बिहारी युवक फरारी झाला असून त्याच्याविषयी कसलीच माहिती मिळत नाही अशी स्थिती आहे.