बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहात असलेले सतीश जारकीहोळी यांची राज्याच्या राजकारणात अधिक गरज असून त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हायकमांडने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केपीसीसी सदस्या आयेशा सनदी यांनी केली. आज कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सतीश जारकीहोळी हे मंत्री म्हणून आधीच कार्यरत आहेत. काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर येण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी प्रयत्न केले असून बेळगाव जिल्ह्यासह राज्यातही त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत.
त्यामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात अधिक भर देऊन लोकसभा निवडणुकीकडे वळू नये अशी विनंती आयेशा सनदी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार पात्र आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, प्रियांका जारकीहोळी यांच्यासारख्या अनेक महिलांना हायकमांडने संधी दिल्यास आपण त्यांना विजयी करण्यासाठी रात्रंदिवस काम करू.
परंतु आपण ज्यांना नेता मानतो त्यांनी राज्याच्या राजकारणावर अधिक भर देऊन लोकसभा निवडणूक लढवू नये, हायकमांडने त्यांना भविष्यात उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला खुर्शीद मुल्ला, लता माने, रोहिणी बाबासेट, हसीना पिरजादे, सारंबी जत्ती आदींसह काँग्रेस कार्यकर्ते — कार्यकर्त्या उपस्थित होत्या.