बेळगाव लाईव्ह :हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने एक लक्षणीय पाऊल उचलताना कर्नाटक राज्य सरकारने ऑनलाइन प्रणाली अंमलात आणली असून ज्यामुळे जोडप्यांना घरबसल्या आरामात आपल्या विवाहाची नोंदणी करता येणार आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष उप नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह नोंदणी करण्याच्या पारंपरिक प्रक्रियेला फाटा मिळणार असून डिजिटल माध्यमामुळे ती अधिक सुव्यवस्थित होणार आहे.
अंमलात आणलेल्या नव्या प्रक्रिये अंतर्गत जोडपे केवळ आपली लग्नपत्रिका, फोटो अथवा व्हिडिओ विवाह सोहळ्याचा फुटेज आणि आधार प्रमाणीकरण देऊन घरबसल्या आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र निर्माण करू शकते.
या नवनिर्मितीमुळे जोडप्यांना प्रत्यक्ष उपनोंदणी कार्यालयाला भेट देणे वगैरे नोकरशाहीची जटिलता टाळता येते. तसेच त्यांची विवाह नोंदणी प्रक्रिया देखील निर्बाधा आणि सुलभ पार पडते. राज्य सरकारने विवाह नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरणाचा वापर तसेच या नोंदणी प्रक्रियेतील सुरक्षितता आणि सत्यता वाढविण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक आयुक्तांचे (इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कमिशनर ऑफ स्टॅप्स) सक्षमीकरण केले आहे.
आता पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष उप नोंदणी कार्यालयामध्ये न जाता विवाह केलेले जोडपे नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकते. सदर अर्ज अर्ज ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रिया मोठ्या लोकसंख्येसाठी सहज उपलब्ध व्हावी यासाठी असलेल्या नियुक्त बापूजी सेवा केंद्र आणि ग्राम वन केंद्रांमध्ये दाखल करावे लागतील.
तंत्रज्ञानाची क्षमता वापरून प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हिंदू विवाह नोंदणी कायद्यात सुधारण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्या अनुषंगाने कावेरी 2 सॉफ्टवेअरचा वापर करून ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. सदर सुधारणेबद्दल बोलताना मंत्री बायरेगौडा यांनी ही वापरकर्ता अनुकूल आणि कार्यक्षम प्रणाली असल्याचे स्पष्ट केले. सध्या विवाह नोंदणीसाठी जोडप्याला उप नोंदणी कार्यालयात जावे लागते आणि त्या ठिकाणी फोटो आणि लग्नपत्रिका यासारखे पुरावे सादर करावे लागतात.
तथापि ऑनलाइन प्रणाली अंतर्गत जोडप्याचे आधार प्रमाणीकरण आणि पुरावा (लग्नाचे फोटो व लग्नपत्रिका) अपलोड करावा लागेल. त्या आधारावर नोंदणी प्रमाणपत्र तयार करून संबंधित जोडप्याला धाडले जाईल, असे मंत्री बायरेगौडा यांनी स्पष्ट केले.