बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेसाठी पाच हमी योजना जारी केल्या. या योजनांच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, या योजनांचा सदुपयोग जनतेने करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगावमधील सरदार्स मैदानावर जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर पालिका, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विद्यमाने आज आयोजिण्यात आलेल्या हमी योजनांच्या लाभार्थ्यांच्या संमेलनात ते बोलत होते.
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अन्नभाग्य योजनेच्या डीबीटी पोस्टरचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, याशिवाय तलाव भरणे प्रकल्पाची अंमलबजावणी, कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. हमी योजनेतून वाचलेली रक्कम लाभार्थ्यांनी मुलांच्या शिक्षणासह चांगल्या कामासाठी वापरावी. अनेक अडचणी असतानाही सरकार दरवर्षी ६० हजार कोटी रुपये गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करत आहे. येत्या काळात नवीन रुग्णालय, शाळा, रस्ते बांधणीला प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, हमी योजनेच्या अंमलबजावणीवर टीका करणाऱ्यांनी राज्याला दिवाळखोरीत काढले. आज पाच हमी योजनांच्या यशाची फळे अनुभवायला मिळत असून याचे चिंतन करणे आवश्यक आहे. गृहलक्ष्मी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत देऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यात गृहलक्ष्मी योजनेंतर्गत दर महिन्याला २१२ कोटी रुपये दिले जातात, हि कमी रक्कम नाही. सत्तेवर आल्यानंतर सरकारने सातत्याने जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने सरकारने पाळली आहेत. आगामी काळातही सरकार हार मानणार नाही, असा विश्वास मंत्री हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने पूर्ण केली आहे. अत्यंत कमी कालावधीत पाच हमी योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. हमीभाव योजनेला विरोध करणारे सरकारवर टीका करत होते. मात्र आता विरोधकच लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून हमी योजनांची घोषणा करत आहेत हा आपल्या सरकारचा विजय असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकार नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी, सरकारच्या पाच हमी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार पूर्णपणे यशस्वी असून प्रकल्प अंमलबजावणीत जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार विश्वास वैद्य, बाबासाहेब पाटील, शहर पोलीस आयुक्त एस.एन.सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शुभम शुक्ला, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, मल्लविद्या भगिनी, मल्लविद्या पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.