रयत गल्ली, वडगाव येथील वरचेवर जळून खराब होणारा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असून सध्या या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करण्यात आली असली तरी तो पुन्हा खराब झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
रयत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवली आहे. या ट्रान्सफॉर्मरमधून गेल्या शनिवारी दुपारी स्टेनगनमधून गोळीबार व्हावा तसा आवाज येऊन ठिणग्या उडण्यास सुरुवात झाल्या.
ठिणग्या उडण्याबरोबरच ट्रान्सफॉर्मर खालील पेटीत आग लागून आतील सर्व वायरिंग जळाले होते. यासंदर्भात हेस्कॉमकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या कर्मचार्यांनी येऊन ट्रान्सफॉर्मरची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. तथापि सदर दुरुस्ती म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे.
सदर विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंव्हा हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष पहाणी करुन चांगली दुरुस्ती करावी किंवा जुना बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि जनतेतील घबराट दुर करावी.
अन्यथा जर पुन्हा ठिणग्या उडण्याचे, आग लागण्याचे प्रकार घडल्यास आंदोलन छेडून महिला आणि नागरिकांचा मोर्चा हेस्कॉम कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा रयत गल्ली शेतकरी कमिटी आणि रयत संघटनेतर्फे देण्यात आला आहे.