गोव्याहून येणाऱ्या लोकांसाठी बेळगावातील प्रवेश मार्ग असलेल्या पिरनवाडी ते हुंचेनट्टी क्रॉसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. पिरनवाडी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पिरनवाडी ते हुंचेनट्टी क्रॉसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला या मार्गाने ये-जा करणाऱ्या परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गोव्याकडून बेळगावकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी हा एक रस्ता आहे. मात्र सध्या या रस्त्याच्या एका बाजूला केरकचरा, कचऱ्याच्या पिशव्या, टाकाऊ साहित्य, मयतांची अंथरूण-पांघरूण उशागाद्या वगैरे टाकण्यात येत असल्यामुळे हा रस्ता एका बाजूने कचऱ्याने पूर्णपणे भरुन गेला आहे.
यातभर म्हणून या रस्त्यावर कचऱ्याच्या ठिकाणी जवळपास 7 -8 मृत कुत्र्यांची कलेवरे पडली आहेत. ही मेलेली कुत्री सडल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. एकंदर बेळगावला येणाऱ्या गोव्याच्या लोकांचे या पद्धतीने दुर्गंधी आणि कचऱ्याच्या साम्राज्याने स्वागत होत आहे.
सदर प्रकारास पिरनवाडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. केरकचऱ्यासह अस्वच्छतेने ग्रासलेल्या या रस्त्यामुळे फक्त पिरनवाडी नव्हे तर बेळगाव शहराचे नांव परगावच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून खराब होऊ शकते किमान याची तरी जाण प. पंचायतीने ठेवावी अशी सखेद प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे पिरनवाडी पट्टण पंचायतच्या अधिकारी यांनी किमान जनाची लाज नाही तर मनाची लाज बाळगून पिरनवाडी ते हुंचेनट्टी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याशेजारी साचून पडलेल्या कचऱ्याची युद्धपातळीवर साफ-सफाई करून घ्यावी. तसेच यापुढे याठिकाणी कचरा फेकला जाणार नाही या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.