सोयाबीनच्या दरातील अचानक झालेली घसरण आणि गाजराचे निकृष्ट बियाणे पुरवलेल्या कंपनीकडून भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नेसरगीजवळ बेळगाव–बागलकोट राज्य महामार्ग रोखून धरत जोरदार निदर्शने केली.
कर्नाटक राज्य रयत संघ, हसीरू सेने, कन्नड आणि दलित संघटनांचा महासंघ आदींनी संयुक्तपणे नेसरगीजवळ बेळगाव-बागलकोट राज्य महामार्ग रोखून जोरदार निदर्शने केली.
सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल १० हजार रु करावा, राज्य आणि केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण सोडून द्यावे, जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाची दरवाढ मागे घ्यावी, टाकी कंपनीने गाजराचे निकृष्ट बियाणे पुरविल्याने त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी आणि एकरी ८० हजार रु भरपाई द्यावी या व अन्य मागण्या केल्या.
या निदर्शनावेळी बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बोलताना राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी सिद्धमनवर म्हणाले, आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहतो. अन्याय झाल्यास त्यावर प्रश्न करणे सर्वांचा अधिकार आहे.
सरकार संपूर्ण व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा डाव रचत आहे. त्याविरोधात सर्व शेतकऱ्यांनी संघटीत व्हायला हवे.
यावेळी राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, संघटन सचिव मल्लिकार्जुन रामदुर्ग, बसवराज चिक्कनगौडर, महांतेश हिरेमठ आदी उपस्थित होते.