भारतीय हवाई दलाच्या 89 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘हर काम देश के नाम’ या घोषवाक्यासह बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलतर्फे आयोजित एक सप्ताहाच्या सायकलिंग मोहिमेला आज दमदार प्रारंभ झाला.
सांबरा बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी आज सोमवारी सकाळी एक सप्ताहभर चालणाऱ्या या सायकलिंग मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एअरमन ट्रेनिंग स्कूलचे स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मित्तू उपस्थित होते. त्यांनी मोहिमेत सहभागी सायकलपटूना शुभेच्छा देण्याबरोबरच ध्वज दाखवून सायकलिंग मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी निमंत्रितांसह हवाई दल व ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
शारीरिक तंदुरुस्तीसह साहसीवृत्ती वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलने आयोजित केलेली ही सायकलिंग मोहीम येत्या 21 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेत 8 हवाई योद्ध्यांचा चमू सहभागी आहे. सांबरा, दांडेली, कारवार, यल्लापुर, कित्तूर आणि परत सांबरा असा सुमारे 500 कि. मी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास या मोहिमेद्वारे केला जाणार आहे.
भारतीय हवाई दलाच्या ‘नभ स्पर्शम् दीप्तम्’ अर्थात गगनाला गौरवाने स्पर्श करा या बोध वाक्याला अनुसरून मोहिमेत सहभागी सायकलपटू प्रवास मार्गातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तेथील युवापिढीला भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.