१ नोव्हेंबर काळ्या दिनी म. ए. समितीच्या अरविंद पाटील आणि दिगंबर पाटील गटाने एकत्रित येऊन निषेध सभा घ्यावी, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिवस्मारकात झालेल्याआजच्या बैठकीत केली. यासंदर्भात दोन्ही अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तालुका समितीतील दोन्ही गट गेल्या काही वर्षांपासून दोन वेगवेगळ्या निषेध सभा घेत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत आहे. परिणामी दोन्ही गटातील अंतर ताणले जात असून हे चळवळीस हानिकारक आहे. त्याकरिता काळ्या दिनाचे गांभीर्य जाणून दोन्ही गटांनी एकत्रीत निषेध सभा घ्यावी. असे आवाहन तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले आहे.
काळ्या दिनाच्या निषेध सभेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा, यासाठी तालुकाभर विभागवार बैठका घेणार असून, युवा समितीच्या सदस्यांची नोंदणी करणार असल्याची माहिती सचिव सदानंद पाटील यांनी दिली.
भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय बेळगावहून चेन्नई ला हलविण्यात आले आहे. तसेच भाषिक जनगणनेत चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात दिल्लीदरबारी आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांची भेट घेण्यात येणार असल्याचे मारुती गुरव यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील,विनायक सावंत,रामचंद्र गावकर, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील आदी उपस्थित होते.