Saturday, January 4, 2025

/

नागीण हा त्वचा रोग होतो कसा उपचार काय ?

 belgaum

नागीण हा एक त्वचारोग असून यामध्ये वेदनादायक बारीक बारीक असंख्य पुरळ व चट्टा उठतो. नागीण या रोगाबद्दल बरेच गैरसमज आढळून येतात. उदा. या नागिणीचे तोंड व शेपूट जुळले की रूग्णाचा मृत्यू ओढवतो. किंवा वारूळातील माती आणून त्याचा लेप लावल्याने नागीण बरी होते वगैरे. परंतु या फक्त दंतकथा असून त्यात अजिबात तथ्य नाही. नागीण किंवा इंग्रजीमध्ये हर्पिस झॉस्टर अर्थात शिंगल्स! या विकाराल कारणीभूत नाग किंवा नागीण नसून एक विशिष्ट विषाणू आहे. ज्या विषाणूमुळे कांजिण्यासुध्दा येतात. एकदा कांजिण्या एखाद्या व्यक्तीला झाल्या तर हा विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात कायमचे वास्तव्य करून राहतो. हा विषाणू पुढील आयुष्यात पुनःश्‍च सक्रिय झाल्यास त्या व्यक्तीला कांजिण्या न येता नागीण होते.

हा विषाणू पुनःश्‍च सक्रिय होण्यास एकतर ती व्यक्ती वयस्क असली पाहिजे किंवा अति मानसिक व शारीरिक ताणातून जात असली पाहिजे अथवा त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असली पाहिजे. अति उष्णता, अतिशय काम, खुप मानसिक ताण, खालावत चाललेली प्रतिकारशक्ती यामुळे हा विषाणू नागिणीच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतो. हा विषाणू माणसाच्या चेतनवाहिन्यांमध्ये राहतो. ज्या चेतनवाहिन्या पाठीच्या कण्यामधील कशेपासून निघतात, त्यामध्ये या विषाणूचे वास्तव्य असते.
लक्षणे- ज्या चेतनवाहिनीमध्ये हा विषाणू असतो त्या शिरेच्या मार्गावर दुखू लागते व असह्य आग होते. दाह होतो. उदा. छातीकडून पाठीकडे किंवा मानेपासून गळ्याकडे, कमरेपासून पोटाकडे इ.
त्यानंतर 2-3 दिवसांनी विषाणू त्वचेकडे पोहोचल्यावर लालसर रक्तफोड येतात जे कांजिण्यांसारखेच दिसतात. परंतु हे फोड त्या चेतनवाहिनीच्या मार्गावरच येतात. इतरत्र येत नाहीत.

Nagin

दोन तीन दिवसांनी हे फोड फुटतात व जखम तयार होते. पुन्हा पुढच्या मार्गावर फोड येतात. अशी ही जखम पुढेपुढे सरकत जाते. परंतु एकाच दिशेने हे फोड सरकत जातात. चेहर्‍यावर, मानेवर, छाती, पोट व पाठ क्वचित हाता- पायांवर अशी रॅश दिसू शकते. या फोडातून पाणी व चिकट स्राव होतो. अंगात कणकण येते. अंगदुखी, डोकेदुखी होते. क्वचित चत, दृष्टी, श्रवण यांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. तोंडाची चव बदलते किंवा काही चवी समजत नाहीत. डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही. कानाचे कार्य बिघडते अर्थात जी चेतनवाहिनी बाधित होते, तिचे कार्य बिघडते.

या विकाराचा उपचार जर व्यवस्थित झाला नाही व सगळी लक्षणं दबली गेली (सप्रेशन) तर पोस्ट हर्पेटिक न्युराल्जिया नावाचा नवीनच त्रास होतो. जी चेतनवाहिनी या विषाणूमुळे बाधित झाली असेल त्या जागेवर, सारख्या असह्य कळा, वेदना होत राहतात. जरी नागीण बरी झाली तरी तिचा डंख मात्र पुढे खूप वर्षे राहू शकतो.
उपचार
रूढ उपचार- मॉडर्न मेडिसीनमध्ये असायक्लोव्हिर, डेस्सायक्लोव्हीर, फॅमसाफक्लोव्हीर, पेनसायक्लोव्हीर या नावाची विविध औषधं उपलब्ध आहेत. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधं व दाह आणि खाज कमी करण्यासाठी अँटीहिस्टामिनिक औषध वापरली जातात. परंतु यात सप्रेशनचा धोका असतो.
होमिओपॅथी- हर्पिसझॉस्टरच्या प्रत्येक लक्षणावर व प्रकारांवर हरतर्‍हेची होमिओपॅथिक औषधं उपलब्ध आहेत. उदा. हर्पिस होऊन गेल्यावर चेहर्‍यावरची नस दुखत असल्यास कॅलकेरिया ग्रुपमधील औषधं उपयोगी ठरतात. जरा जरी हालचाल झाली तर नागीन झालेला भाग ठसठसतो. छातीवर चट्टा उठतो. या लक्षणावर नॅननक्युलस बल्बोसस ही औषधी उत्कृष्ट आहे. शिवाय रसटॉक्स, क्रोटाँनटीग, युफोर्बिया, मेझेरियम अशी एक ना अनेक औषधे रूग्णानुसार वापरावी लागतात. या बाबतीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे उत्तम!
इतर उपचार- वेदना कमी करण्यासाठी थंड (बर्फाच्या) पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. ओटमील मिश्रण जखमेवर पसरावे अथवा कॅलामाईन किंवा स्टार्च लावल्याने खाज व दाह कमी होतो. विश्रांती घ्यावी, सुती कपडे वापरावेत

Dr sonali sarnobat

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.