Sunday, June 16, 2024

/

सांबरा यात्रा रहदारी नियंत्रणात रहदारी पोलीस यशस्वी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेसाठी भाविकांचा प्रचंड जनसागर उसळून बेळगाव -सांबरा रस्त्यावर झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीवर पोलीस प्रशासनाने उपाय शोधून योग्य नियोजन केल्यामुळे आज रविवारी यात्रेच्या प्रमुख दिवशी अलोट गर्दी असूनही वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. पोलिसांच्या उपाययोजनेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निकालात निघाली मात्र भाविकांची पायपीट मात्र वाढल्याचे पाहायला मिळाले.

सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेला येण्यासाठी भाविकांना बेळगावहून 2 कि.मी. अंतराची पायपीट करावी लागत आहे. दुचाकी गाड्या फक्त मुतग्यापासून सोडल्या जात आहेत. त्याचप्रमाणे चार चाकी गाड्या मुतगा येथेच अडवून पार्क करण्यास सांगितली जात असल्यामुळे भाविकांना तेथून पायी चालत सांबरा गाठावे लागत आहे. काल शनिवारी झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सदर उपाययोजना केली आहे.

त्यामुळे भाविकांना चालत जावे लागत असले तरी कालच्या प्रमाणे वाहतूक कोंडीचा मनस्ताप त्यांना सहन करावा लागला नाही. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनिंग यांनी जातीने लक्ष देऊन सांबरा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घेतली त्यामुळे विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची देखील चांगली सोय झाली होती.

 belgaum

आज रविवार सुट्टीचा दिवस असण्याबरोबरच सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेचा मुख्य दिवस असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने कालच्या ‘मेगाब्लॉक’ वर उपाय काढल्यामुळे आज रहदारीची कोंडी न होता सांबरा मार्गावर गर्दीपूर्ण तथापि सुलभ रहदारी होताना पहावयास मिळाली. बेळगाव रहदारी पोलिसांनी कुशल नियोजन करत रस्त्याकडेला आणि मुतगा गावाच्या आसपास चार चाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याद्वारे रस्ता मोकळा राहील याची दक्षता घेतली होती.Traffic police

बेळगाव कडून सांबऱ्याकडे केवळ यात्रेसाठी जाणारी चार चाकी वाहने निलजी आणि मुतगा परिसर पर्यंत सोडली जात होती.पोलीस ठिकठिकाणी चार चाकी वाहनांची आढळून करून चार चाकी वाहनांची पार्किंग करून लोकांना चालत सोडत होते. सर्वात आधी बेळगाव सांबरा रोड वरून यात्रा आणि विमानतळावर जाणाऱ्या व्यतिरिक्त होणारी इतर वाहतूक व्हाया कणबर्गी अष्टे सुळेभावी या मार्गावर वळवण्यात आली होती त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी डायव्हर्ट झाली होती. केवळ दुचाकी वाहनांना सांबरा गावापर्यंत प्रवेश दिला जात होता चार चाकी वाहने मध्ये पार्किंग करून भाविकांना पायपीट करत पोलीस सोडत होते.

श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा आज प्रमुख आणि शेवटचा दिवस असल्यामुळे सांबरा गावात भाविकांची अलोट गर्दी होत आहे. मात्र वाहतुकीच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने घेतलेल्या दक्षतेमुळे कालची वाहतुकीची कोंडी आज रविवारी पहावयास मिळाली नाही. सर्वत्र नीटनेटकेपणा दिसत होता. एकंदर यात्रेला पायी चालत यावे लागत असले तरी भाविकांचा त्रास कमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.