belgaum

मराठी माणसाच्या प्रामाणिकपणावर शंका घेणारे तुम्ही कोण?

0
Mes logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :आजही सीमाभागातील मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे. त्याने अनेक दशकांचा संघर्ष पाहिला आहे, बलिदाने पाहिली आहेत, तुरुंगवास भोगलेले कार्यकर्ते पाहिले आहेत आणि मराठी अस्मितेसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणारी पिढीही पाहिली आहे. त्यामुळे मराठी जनतेच्या प्रामाणिकपणावर बोट ठेवण्याचे धाडस करणाऱ्यांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा.

ज्या जनतेने प्रत्येक निवडणुकीत आपली अस्मिता जपत अधिकृत मराठी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा इतिहास घडवला, ज्या जनतेने गद्दारी करणाऱ्यांना आणि फूट पाडणाऱ्यांना वेळोवेळी धडा शिकवला, त्याच जनतेला आज प्रलोभनांना बळी पडणारी, अप्रामाणिक आणि दिशाहीन ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा केवळ जनतेचा अपमान नाही, तर सीमाभागातील संपूर्ण मराठी चळवळीच्या त्यागाचा अवमान आहे.

खरे तर मराठी माणूस हरला नाही; त्याला हरविण्याचे षड्यंत्र रचले गेले. मतांचे विभाजन झाले, स्वार्थासाठी वेगवेगळ्या चुली पेटविल्या गेल्या, मराठी एकजुटीला खिळखिळे करण्याचे उद्योग झाले. पण या सर्वांचे खापर मात्र सामान्य मराठी जनतेच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतः केलेल्या चुका लपवण्यासाठी जनतेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा सोयीस्कर उद्योग आहे.

 belgaum

मराठी समाजाला उपदेश करणाऱ्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. मराठी मतांचे तुकडे कोणी केले? मराठी माणसाच्या ऐक्यावर घाला कोणी घातला? संघर्षाच्या नावावर स्वतःची पोळी कोणी भाजली? राष्ट्रीय पक्षांच्या दारात हुजरेगिरी करत मराठी अस्मितेचा व्यापार कोणी केला? या प्रश्नांची उत्तरे जनतेला चांगलीच माहिती आहेत. म्हणूनच आज सीमाभागातील सामान्य माणूस शांत असला तरी अंधळा नाही; तो सर्व पाहत आहे, समजून घेत आहे आणि योग्य वेळेची वाट पाहत आहे.

सीमाभागातील मराठी जनता कोणाची जहागीर नाही, कोणाच्या दावणीला बांधलेला कळप नाही. ती विचार करणारी, संघर्ष करणारी आणि स्वाभिमानाने जगणारी जनता आहे. तिच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कारण मराठी माणसाने आपल्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी आणि ओळखीच्या रक्षणासाठी जे बलिदान दिले आहे, त्याची उंची काही स्वार्थी भाषणबाजांच्या शब्दांपेक्षा कितीतरी मोठी आहे.

Mes logo

लबाड लांडगे नेहमी कळपावरच आरोप करत असतात. स्वतःच्या पावलांचे ठसे मिटवण्यासाठी ते कळपाला दोषी ठरवतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. कळपाला लांडग्यांची ओळख पटली आहे. मराठी जनतेला कोण संघर्षाचा खरा वारसदार आहे आणि कोण स्वार्थाचा व्यापारी आहे हे कळू लागले आहे.

इतिहास साक्षी आहे—मराठी माणूस शांत असतो, पण कमकुवत नसतो. तो सहन करतो, पण विसरत नाही. आणि जेव्हा वेळ येते, तेव्हा उत्तरही देतो. ते उत्तर भाषणातून नसते, घोषणांतून नसते; ते उत्तर मतपेटीतून असते. स्वाभिमानाच्या बाजूने आणि स्वार्थाच्या विरोधात असते.

म्हणून मराठी जनतेवर आरोप करण्यापेक्षा, तिच्या निष्ठेची थट्टा करण्यापेक्षा आणि तिच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यापेक्षा, काहींनी स्वतःच्या कुटील डावपेचांचे आत्मपरीक्षण करावे. अन्यथा सीमाभागाचा स्वाभिमानी मराठी माणूस इतिहासाप्रमाणेच पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य धडा शिकवेल. कारण मराठी अस्मिता विकत घेता येत नाही, आणि स्वाभिमान कोणाच्या दावणीला बांधता येत नाही.स्वाभिमानी मराठी जनतेची परंपरा: गद्दारीला कधीच माफी नाही!

सीमाभागातील मराठी जनतेने वेळोवेळी आपल्या मतदानातून एक स्पष्ट संदेश दिला आहे — मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संघर्षाशी बेईमानी करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना तब्बल ७० हजारांच्या घरात मते देऊन मराठी जनतेने आपली निष्ठा आणि एकजूट सिद्ध केली होती. तत्पूर्वी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या सर्व ताकदीसमोर उभे राहून शुभम शेळके यांना लाखोपार मते देत मराठी मतदारांनी सीमालढ्याचा झेंडा अजूनही तितक्याच अभिमानाने फडकत असल्याचे दाखवून दिले.

इतकेच नव्हे, एका निवडणुकीत समितीची मते फोडण्यासाठी किरण सायनाक यांना प्रकाश मरगाळे यांच्या विरोधात उभे करण्यात आले. विविध राजकीय डावपेच रचले गेले, मतांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, मराठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सीमाभागातील स्वाभिमानी मराठी मतदारांनी या कारस्थानांना बळी न पडता आपले मत अधिकृत समितीच्या पारड्यात टाकले ग्रामीण उत्तर या मतदारसंघात तर या फुटीरवाद्यांना नाममात्र मत मिळाली आणि फुटीर राजकारणाला जोरदार चपराक दिली.

सीमाभागातील मराठी माणूस भावनिक आहे, पण भोळा नाही. तो इतिहास विसरत नाही आणि गद्दारीही माफ करत नाही. सीमालढ्याच्या नावावर स्वतःची पोळी भाजणारे, स्वार्थासाठी मराठी समाजात फूट पाडणारे, खोट्या समित्यांचे दुकान मांडणारे आणि महाराष्ट्र एकीकरणाच्या संघर्षाचा वापर वैयक्तिक राजकारणासाठी करणारे अनेक चेहरे जनतेने वेळोवेळी ओळखले आहेत.

आजवर मराठी जनतेने एकच गोष्ट सिद्ध केली आहे — समितीशी, सीमालढ्याशी आणि मराठी अस्मितेशी प्रामाणिक राहणाऱ्यांना डोक्यावर घेऊ; पण गद्दारी करणाऱ्यांना, फूट पाडणाऱ्यांना आणि स्वार्थी नेतृत्वाला राजकीयदृष्ट्या धूळ चारण्याची ताकदही आमच्यात आहे.

सीमाभागाचा इतिहास हा स्वाभिमानाचा इतिहास आहे. हुतात्म्यांच्या बलिदानावर उभ्या असलेल्या या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मराठी जनतेची स्मरणशक्ती कमकुवत नाही. योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची परंपरा या भूमीने कायम जपली आहे.

मराठी माणूस विकत घेतला जाऊ शकतो, ही ज्यांची समजूत आहे त्यांनी इतिहास पुन्हा वाचावा; कारण सीमाभागातील स्वाभिमानी मराठी जनता आजही अस्मिता, निष्ठा आणि संघर्ष यांनाच मत देते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.