बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण भागातील हलगा गावची रहिवासी असलेल्या सरिता मनोहर चौगुले या विद्यार्थिनीला कोल्हापूर येथे बी.ई. (इंजिनिअरिंग) प्रवेशासाठी बॉर्डर सर्टिफिकेटची अत्यंत आवश्यकता होती. मात्र, तहसीलदार कार्यालयात सकाळपासून हेलपाटे मारूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने अखेर समाजसेवक सुनील जाधव यांनी तात्काळ पुढाकार घेत अवघ्या १० मिनिटांत हे काम करून दिले.
सरिता चौगुले हिचे संपूर्ण शिक्षण कर्नाटकात झाले असून तिला कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा होता.
तेथे डोमासाईल प्रमाणपत्राची अडचण आल्यामुळे तिला बॉर्डर सर्टिफिकेटवर तहसीलदारांच्या स्वाक्षरीची गरज होती. यासाठी ती सकाळी साडेदहा वाजेपासून तहसीलदार कार्यालयात चौकशी करत फिरत होती, परंतु तिला दाद मिळत नव्हती. प्रवेशाची मुदत संपत आल्याने तिचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले होते.

शेवटी बेळगाव लाईव्हच्या संजय चौगुले यांच्या माध्यमातून तिने समाजसेवक सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधला. सुनील जाधव यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयात धाव घेऊन अवघ्या १० मिनिटांत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि तहसीलदारांच्या स्वाक्षरीसह बॉर्डर सर्टिफिकेट विद्यार्थिनीच्या स्वाधीन केले.
हे प्रमाणपत्र वेळेत मिळाले नसते तर सरिताचा इंजिनिअरिंगचा प्रवेश रद्द झाला असता. तसेच तिला कर्नाटकात प्रवेश घ्यावा लागला असता तर दीड ते दोन लाख रुपये फी भरावी लागली असती. मात्र, आता बॉर्डर सर्टिफिकेट मिळाल्यामुळे तिची फी सुमारे ९० टक्क्यांनी कमी होणार असून १ लाख १५ हजारांऐवजी केवळ २० हजारांत तिचा प्रवेश निश्चित होणार आहे. या संकटसमयी मोलाची मदत केल्याबद्दल विद्यार्थिनीने समाजसेवक सुनील जाधव यांचे आभार मानले आहेत.





