बेळगाव लाईव्ह : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणाव आणि मानसिक दबावामुळे पॅनिक अटॅकचे प्रमाण वाढत असल्याचे मत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भीतीचे योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर उपचार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सरनोबत म्हणाल्या की, पॅनिक अटॅक म्हणजे एखाद्या भीतीच्या किंवा तणावपूर्ण परिस्थितीमुळे अचानक तीव्र घबराट निर्माण होणे. परीक्षेची भीती, मुलाखत, गर्दी, लिफ्ट, उंच इमारती किंवा विमानप्रवास यांसारख्या प्रसंगी काही व्यक्तींना छातीत धडधड, हात-पाय थरथरणे, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
त्यांच्या मते, अशा समस्यांवर होमिओपॅथी आणि बॅच फ्लॉवर (पुष्पौषधी) उपचारपद्धतीचा उपयोग केला जातो. मात्र कोणतेही औषध स्वतःहून दीर्घकाळ घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ध्यान, सकारात्मक विचार आणि समुपदेशनाचा आधार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भीती किंवा पॅनिक अटॅकची समस्या वारंवार जाणवत असल्यास ती दुर्लक्षित न करता मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सरनोबत यांनी संतांच्या “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” या विचाराचा उल्लेख करत, प्रसन्न मन आणि सकारात्मक दृष्टीकोन हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.





