belgaum

गुणवंत पाटील शिवाजी शिंदेकडून नवोदित कवींना लेखनाचा मंत्र

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), विश्व भारत सेवा समिती (बेळगाव), पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय (शहापूर) आणि मंथन मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात ‘काव्य लेखन कार्यशाळा व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ’ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करताना कार्यशाळेची पार्श्वभूमीवर आणि मुख्य उद्देशावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापिका अर्चना नांद्रे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. या सोहळ्यात आयोजित निबंध स्पर्धेत
प्रथम क्रमांक: धनश्री मारुती बाचीकर (जिजामाता हायस्कूल, बेळगाव)द्वितीय क्रमांक: प्रगती अनिल कित्तुरकर (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव)तृतीय क्रमांक: सुवर्णा सुहास मोदगेकर (रणझुंजार हायस्कूल, निलजी)भाग्यश्री आप्पया मोदगेकर (रणझुंजार हायस्कूल, निलजी)
हर्ष गावडू पाटील (मराठी विद्या निकेतन, बेळगाव
यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी नवोदित कवींना निरंतर शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कलाकार हा दररोज नवीन गोष्टी शिकत असतो आणि दुसऱ्याच्या साहित्यातून चांगलं घेण्याची वृत्ती कवीसाठी गरजेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कविता लेखनासाठी शब्द प्रपंच अतिशय महत्त्वाचा असून कवीची बुद्धि, नजर आणि कान नेहमी जागृत असले पाहिजेत. ज्याप्रमाणे चित्रकार विविध रंगांच्या छटांमधून चित्र जिवंत करतो, तसेच कवीला शब्दांचे भाव समजले पाहिजेत. शिल्पकार ज्याप्रमाणे दगडातील नको असलेला भाग काढून सुंदर शिल्प तयार करतो, त्याचप्रमाणे घटनेतील अनावश्यक भाग वगळून महत्त्वाचा भाग प्रभावीपणे मांडणे म्हणजे कविता होय. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग आणि समाजातील घडामोडींवर अंतर्मनातून व्यक्त होण्याचा आणि सातत्याने लिहिण्याचा रियाज करण्याचा सल्ला दिला.

 belgaum

दुसऱ्या सत्रात कवी व पत्रकार शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शब्दांचा छंद निर्माण करण्याच्या संस्थाचालकांच्या भूमिकेचे कौतुक केले. कविता हा अस्वस्थ मनाचा आणि भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार असतो, असे सांगताना त्यांनी कवी ग्रेस, कुसुमाग्रज आणि वसंत बापट यांच्या कवितांचे दाखले दिले. उत्तम काव्यनिर्मितीसाठी वाचनाचा रियाज आवश्यक असून त्यातूनच शब्दांचे भांडवल उभे राहते, असे ते म्हणाले. आजच्या मुक्त छंदाच्या काळात वृत्त किंवा लय यापेक्षा कवितेचा आशय अधिक महत्त्वाचा ठरतो. कविता किती मोठी आहे यापेक्षा ती समाजाला काय आशय देते, यावर तिचे मोठेपण ठरते, असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या काही निवडक कविताही सादर केल्या. मार्गदर्शनाचा समारोप करताना त्यांनी नवोदित कवींसाठी पहिल्या टप्प्यात भावना कागदावर उतरवणे, दुसऱ्या टप्प्यात विसंगत शब्द काढणे आणि तिसऱ्या टप्प्यात त्याची चपखल शब्दांत मांडणी करून लय शोधणे, अशी कविता लिहिण्याची सोपी पद्धत मांडली.

या संपूर्ण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणूनविलास घाडी आणि देवकुमार बिर्जे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित करणारे प्रेरणादायी विचार मांडले. यावेळी साहित्यप्रेमी, मान्यवर, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक वर्ग, नवोदित कवी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन मयूर नागेनहळ्ळी यांनी , तर प्रा. रेणुका चलवेटकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.