बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात बेकायदेशीर मटका व्यवसायासह विविध गुन्हेगारी कृत्यांत सातत्याने सहभागी असलेल्या सराईत आरोपी फहीम जैलानी कोतवाल (वय 45, रा. खंजर गल्ली, बेळगाव) याला बेळगाव शहर पोलिसांनी दुसऱ्यांदा तडीपार केले आहे. 16 जुलै 2026 रोजी त्याला बेळगाव जिल्ह्याबाहेर हावेरी जिल्ह्यातील हावेरी टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीम कोतवाल हा 2005 पासून सराईत गुन्हेगार म्हणून सक्रिय असून, बेकायदेशीर मटका व्यवसाय, सांप्रदायिक दंगलीत सहभाग, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न तसेच अत्यावश्यक वस्तूंचा अवैध साठा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे.
त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण 48 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये मार्केट पोलीस ठाण्यात 34, खडेबाजार पोलीस ठाण्यात 7, माळमारुती पोलीस ठाण्यात 5, टिळकवाडी पोलीस ठाण्यात 1 आणि सीईएन पोलीस ठाण्यात 1 गुन्ह्याचा समावेश आहे.
या 48 गुन्ह्यांपैकी 25 प्रकरणांत न्यायालयाने शिक्षा सुनावली असून, प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत दाखल झालेल्या सहा प्रकरणांत त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बाँडही घेण्यात आला होता. मात्र, त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवल्याने हा बाँड मोडला गेला. त्यामुळे त्याची 50 हजार रुपयांची बाँड रक्कम शासनाकडे जप्त करण्यात आली आहे.

यापूर्वी 2022 मध्येही फहीम कोतवालवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याने गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली नसल्याने सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्यांदा तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने म्हटले आहे.





