belgaum

यात्रोत्सवासाठी गावी आले, कामासाठी गोव्याला गेले; परतताना काळाचा घाला!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :गावात श्री माऊलीदेवीचा यात्रोत्सव सुरू होता… घरचे सगळे आनंदात होते. यात्रेनिमित्त गावी आलेले विनोद गुरव कामासाठी गोव्याला गेले आणि दिवसभराचे काम आटोपून पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतण्यासाठी निघाले. रात्री कुटुंबीयांशी फोनवर बोलताना त्यांनी आपण रामनगर येथे असल्याचेही सांगितले. त्यामुळे घरच्यांना ते लवकरच घरी पोहोचतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांपर्यंत रात्री उशिरा एक दुःखद बातमी पोहोचली… वाटरे आणि जोमतळे गावांदरम्यान झालेल्या भीषण कार अपघातात विनोद यांचा मृत्यू झाला होता.

खानापूर–लोंढा महामार्गावर गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हा अपघात घडला. गुंजी (ता. खानापूर) येथील विनोद संभाजी गुरव (वय ३९) हे कारने प्रवास करत असताना धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यांची कार दोन पलट्या खाऊन उलटली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विनोद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

फोन उचलला दुसऱ्याने अन् कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर!

विनोद हे नोकरीनिमित्त गोव्यात राहत होते. गुंजी येथे गेल्या चार दिवसांपासून श्री माऊलीदेवीचा यात्रोत्सव सुरू असल्याने ते यात्रेसाठी गावी आले होते. मात्र, कामानिमित्त गुरुवारी सकाळी ते गोव्याला गेले. दिवसभराचे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी पुन्हा गावी परतण्यासाठी निघाले.

 belgaum

रात्री नऊच्या सुमारास कुटुंबीयांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला, तेव्हा आपण रामनगर येथे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर घरचे त्यांच्या परतीची वाट पाहत होते. मात्र, रात्री अकरा वाजले तरी विनोद घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी पुन्हा त्यांच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी फोन दुसऱ्याच व्यक्तीने उचलला आणि विनोद यांचा अपघात झाल्याची माहिती दिली.

काही वेळापूर्वी आपल्याशी बोललेली व्यक्ती आता या जगात नाही, ही बातमी कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरली. ज्या विनोद यांच्या घरी परतण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्याच निधनाची बातमी ऐकण्याची वेळ कुटुंबावर आली.

दोन आणि चार वर्षांच्या मुली पोरक्या; कुटुंबाचा आधार हरपला!

विनोद गुरव यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या चार आणि दोन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली, आई-वडील, मोठा विवाहित भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. वडिलांच्या प्रेमाची आणि आधाराची खरी जाणीव होण्यापूर्वीच या दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे.

कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विनोद यांच्या अचानक जाण्याने पत्नी आणि वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी गोव्यात नोकरी करणाऱ्या विनोद यांचा प्रवास अशा प्रकारे संपेल, याची कल्पनाही त्यांच्या कुटुंबीयांनी केली नव्हती.

यात्रेच्या आनंदावर दुःखाचे सावट

गुंजी गावात श्री माऊलीदेवीचा यात्रोत्सव सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. यात्रेनिमित्त गावी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. आनंदाच्या वातावरणात अचानक दुःखाची बातमी आल्याने विनोद यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे.

अपघातानंतर विनोद यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शुक्रवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून, त्यानंतर गुंजी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दोन चिमुकल्या मुली, पत्नी आणि वृद्ध आई-वडिलांना मागे ठेवून विनोद गुरव यांचा झालेला अकाली मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.