belgaum

दोन वर्षे रेशन बंद, पेन्शनही तुटपुंजी;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : “वय झालेय, अंगात ताकद उरलेली नाही… आई-वडिलांचे छत्र कधीच हरपले, आणि ९० टक्के अपंगत्वामुळे ही दोन हात-पायही साथ देईनासे झालेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून हक्काचं रेशन बंद आहे, आणि मिळणारी पेन्शन औषधांनाही पुरत नाही. साहेब, मला जगण्यासाठी सरकारी योजना तरी द्या, नाहीतर एकाच वेळी विष तरी देऊन टाका!” ही काळीज पिळवटून टाकणारी आर्त साद आहे सोनोली येथील ९० टक्के दिव्यांग वृद्ध महिला मल्लवा झंगरुचे यांची. सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हक्काच्या धान्यापासून वंचित राहिलेल्या मल्लवा यांनी गुरुवारी नातेवाइकांचा आधार घेत थेट बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली.

सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याने आणि अत्यल्प पेन्शनवर उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने सोनोली येथील ९० टक्के दिव्यांग वृद्ध महिला मल्लवा झंगरुचे यांनी नातेवाइकांसह बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. ‘मला सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्या, अन्यथा मला विष द्या,’ अशी आर्त मागणी त्यांनी यावेळी केली. महिलेची बिकट परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीची दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना तिच्या तक्रारीचे निवारण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

मल्लवा यांना लहान वयातच आई-वडिलांचा आधार हरपल्याने त्यांना एकटी संघर्ष करावा लागत असून, ९० टक्के दिव्यांगत्वामुळे दैनंदिन कामांसाठीही त्यांना अतोनात अडचणींचा सामना करावा लागतो. हातापायांच्या मर्यादांमुळे त्यांना साधी कामे करणेही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून अंगठ्याची बायोमेट्रिक पडताळणी करणे शक्य न झाल्याने त्यांचे रेशन कार्ड बंद झाले आहे आणि त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्यापासून पूर्णपणे वंचित राहिल्या आहेत. प्रशासनाकडून घरी पर्यायी व्यवस्था मिळणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने त्यांची दोन वर्षे अन्नाविनाच गेली आहेत.

 belgaum

दुसरीकडे, ९० टक्के दिव्यांगत्व असूनही मिळणारे शासकीय पेन्शन अत्यंत तुटपुंजे असल्याने घरखर्च आणि महागड्या औषधोपचारांचा खर्च भागवणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले आहे. आर्थिक विवंचना आणि सर्व शासकीय सुविधांपासून एकापाठोपाठ एक वंचित राहावे लागल्याने त्यांनी अखेर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले.

वृद्ध महिलेची ही हकीकत ऐकून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने सूत्रे हलवली असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मल्लवा झंगरुचे यांच्या सर्व समस्यांचे निवारण करून नियमानुसार सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.