बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये ऊसाला योग्य दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलन मंगळवारी अधिकच तीव्र झाले. निवडक शेतकरी नेत्यांसोबत जिल्हा प्रशासन अज्ञात स्थळी बैठक घेत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी अचानक रस्ता रोको आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित बैठक वेळेत सुरू न झाल्याने दुपारपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयासमोरून चन्नम्मा सर्कलला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिय्य आंदोलन केले.
यावेळी एसटी बसेस अडवून सरकार व जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तासनतास वाट पाहूनही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली एका गुप्त स्थळी बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी, शशिकांत गुरुजी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे सहभागी झाले आहेत.




