belgaum

ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी पुन्हा बैठक; शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या पहिल्या टप्प्यातील बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, साखर कारखानदारांसोबत आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

यापूर्वी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आपल्या मागण्या आणि अपेक्षा मांडल्या. मात्र, साखर कारखानदारांसोबत चर्चा करून अंतिम तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा निघणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बैठकीत बोलताना शेतकरी संघटनेचे मानद अध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी कारखानदारांकडे स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. प्रतिटन उसाला ३,५०० रुपये दर देण्यास साखर कारखान्यांनी यापूर्वीच सहमती दर्शविली आहे.

 belgaum

मात्र, यापुढे आणखी किती दर देणे शक्य आहे, हे कारखानदारांनी स्पष्ट करावे. शेतकऱ्यांना मान्य होईल असा दर निश्चित झाल्यास आंदोलन मागे घेण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रतिटन उसाला ३,७०० रुपये दर देण्याबाबत साखर कारखानदार अद्याप तयार नसल्याचे चित्र आहे. या दरापर्यंत पोहोचण्यास कारखानदार टाळाटाळ करीत आहेत. मात्र, सरकारकडून दबाव वाढत असल्याने कारखानदार याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज रात्री होणाऱ्या बैठकीत कारखानदार किती दर देण्यास तयार होतात, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार समाधानकारक दर निश्चित झाल्यास आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

ऊस दराचा तिढा बुधवारी सुटणार? सतीश जारकीहोळींची माहिती; कारखानदारांची पुन्हा बैठक होणार!

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील ऊस दर निश्चितीचा तिढा बुधवारी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

मंगळवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृह आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी तसेच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या मागण्यांमध्ये मोठी तफावत असून, दोन्ही बाजूंमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बुधवारी आवश्यकतेनुसार साखर कारखानदारांची पुन्हा बैठक घेण्यात येईल. तसेच ऊस दर निश्चितीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा केली जाणार असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

साखरेच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असल्याने साखर कारखान्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साखरेला किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली आहे. साखरेला एमएसपी निश्चित झाल्यास साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील दरातील अंतर कमी करून दोन्ही बाजूंना मान्य होईल असा दर निश्चित करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे बुधवारी या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

आता बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, यामध्ये ऊस दराचा तिढा सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.