बेळगाव लाईव्ह: सीमाप्रश्नाच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या काळा दिन सायकल फेरीचे प्रकरण आता पोलीस कारवाईमुळे चर्चेत आले आहे. या फेरीप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह एकूण ३० जणांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांकडून काळा दिन पाळण्यात येतो. यंदाही संभाजी उद्यान येथून सकाळी १०.३० वाजता सायकल फेरी काढण्यात आली होती. या फेरीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मात्र, या फेरीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही फेरी काढण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. सार्वजनिक रस्त्यांवरून फेरी काढल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तसेच नागरिकांना त्रास झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी फिर्याद दिली असून, २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह एकूण ३० जणांची नावे गुन्ह्यात नोंदविण्यात आली आहेत.
सीमाप्रश्नाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाच्या कार्यक्रमानंतर आता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या कारवाईवर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुढील भूमिका काय असणार, याकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.




