belgaum

दिवाळीच्या खरेदीवर वाहतूक निर्बंधांचे सावट; ते बॅरिकेडिंग हटवण्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बेळगाव शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि वाहतूक निर्बंध यामुळे व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना बाजारपेठेत पोहोचणे सुलभ व्हावे आणि व्यापारावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील वाहतूक निर्बंधांचा फेरविचार करून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग हटवावे, अशी मागणी श्री बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन आणि ट्रेडर्स कौन्सिलसह व्यापारी संघटनांनी केली आहे.

या संदर्भात अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त प्रकाश निकाम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विकास कलघटगी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. व्यापारी संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून सणासुदीच्या काळातील वाहतूक व्यवस्थेबाबत विविध मागण्या मांडण्यात आल्या.

बेळगाव ही उत्तर कर्नाटकातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असून गोवा, कोकण, हुबळी-धारवाड, उत्तर कर्नाटकातील विविध जिल्हे तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येथे येतात. दिवाळीच्या काळात कापड, कपडे, दागिने, पादत्राणे, गृहपयोगी वस्तू आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी असते. या हंगामासाठी व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा माल दुकानांमध्ये आणून ठेवला आहे. मात्र, शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांवर बॅरिकेडिंग करून रस्ते बंद केल्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेत पोहोचताना अडचणी येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 belgaum

ऑनलाईन व्यापाराच्या वाढत्या स्पर्धेमुळे आधीच पारंपरिक व्यापारी अडचणीत आहेत. त्यातच वाहतूक निर्बंधांमुळे ग्राहकांनी बाजारपेठेत येणे टाळल्यास दिवाळीच्या महत्त्वाच्या हंगामात व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. व्यापाऱ्यांच्या वार्षिक उलाढालीतील महत्त्वाचा वाटा दिवाळीच्या खरेदीतून मिळत असल्याने या काळात अनावश्यक निर्बंधांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

व्यापारी संघटनांच्या नेमक्या मागण्या

व्यापारी संघटनांनी पोलीस प्रशासनासमोर काही ठोस पर्याय आणि मागण्या मांडल्या आहेत.

1. संयुक्त बैठक घ्या : वाहतूक निर्बंध लागू करण्यापूर्वी पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि प्रमुख व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी.

2. प्रमुख व्यापारी रस्ते खुले ठेवा : बाजारपेठेत जाणारे महत्त्वाचे रस्ते अनावश्यकपणे बंद करू नयेत. ग्राहकांना बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल, याची काळजी घ्यावी.

3. वेळेची मर्यादा निश्चित करा : सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले वाहतूक निर्बंध ठरावीक वेळेपुरतेच लागू करावेत. प्रत्यक्ष गरज नसताना दिवसभर रस्ते बंद ठेवू नयेत.

4. वनवे वाहतूक व्यवस्था लागू करा : रस्ते पूर्णपणे बंद करण्याऐवजी काही मार्गांवर वनवे व्यवस्था लागू करून वाहतूक सुरळीत ठेवावी.

5. एआय कॅमेऱ्यांचा वापर करा : वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याचा पर्याय विचारात घ्यावा.

6. अतिरिक्त होमगार्ड नियुक्त करा : गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक होमगार्ड आणि वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहनांची वर्दळ नियंत्रित करावी.

7. पार्किंग आणि मालवाहतुकीची व्यवस्था : बाजारपेठेतील ग्राहकांसाठी शक्य त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. व्यापाऱ्यांच्या मालाची चढ-उतार करण्यासाठीही योग्य व्यवस्था असावी.

8. पर्यायी मार्गांची माहिती द्या : मिरवणुका, रस्ते बंद करण्याच्या वेळा आणि पर्यायी मार्ग यांची माहिती व्यापारी व नागरिकांना आगाऊ द्यावी.

9. व्यापाऱ्यांसाठी संपर्क यंत्रणा : वाहतुकीसंदर्भातील अडचणी तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा निर्माण करावी.

10. सणासुदीच्या खरेदीच्या वेळांना प्राधान्य : दिवाळीच्या गर्दीच्या वेळेत ग्राहकांना बाजारपेठेत ये-जा करता येईल, यासाठी विशेष नियोजन करावे.

पोलीस आयुक्तांकडून बैठकीचे आश्वासन

व्यापारी संघटनांनी पोलीस प्रशासनाच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना करताना व्यापाऱ्यांचा व्यवसाय, ग्राहकांची सोय आणि शहरातील आर्थिक उलाढाल यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करताना पोलीस आयुक्तांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरच तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सतीश तेंडुलकर यांनी दिली. तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतही स्वतंत्र बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावमध्ये येणाऱ्या स्थानिक तसेच बाहेरील ग्राहकांना कोणताही अडथळा येऊ नये आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच व्यापारी पेठांमधील वाहतूकही सुरळीत राहावी, यासाठी आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.