belgaum

काळ्या दिनाला उपस्थिती लावली म्हणून मराठी हॉटेल उद्योजकाला लक्ष्य

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये भाषिक अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या कारणावरून मराठी उद्योजक कपिल भोसले यांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ मराठी भाषिकांच्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे हॉटेल विराट या त्यांच्या व्यवसायावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले जात आहे. विशेष म्हणजे, या आवाहनात कन्नड भाषिक नागरिकांसह केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे एका उद्योजकाच्या व्यवसायाला भाषिक राजकारणाच्या संघर्षात ओढून त्याला आर्थिकदृष्ट्या लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा बेळगावच्या व्यावसायिक वर्तुळात होत आहे.

१ नोव्हेंबर हा सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी काळा दिवस आहे. महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी सीमाभागातील मराठी भाषिक अनेक दशकांपासून आपली भूमिका मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होत आपली भूमिका व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी होणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीने दिलेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. मात्र, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मराठी उद्योजकाला त्याची किंमत व्यावसायिक पातळीवर मोजावी लागावी, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

काही कन्नड संघटनांच्या फेसबुक पेजवरून हॉटेल विराटच्या विरोधात पोस्ट प्रसारित करण्यात आल्या आहेत. या पोस्टमध्ये हॉटेलचे मालक कपिल भोसले हे काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा उल्लेख करून कन्नड भाषिकांनी या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर असलेल्या या हॉटेलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पाऊल ठेवू नये, अशा स्वरूपाचा संदेश प्रसारित करण्यात आला आहे.

 belgaum

‘व्यवसाय करण्यासाठी कन्नडिग ग्राहक हवेत; मात्र बेळगाव कर्नाटकात असणे नको आहे का?’ अशा आशयाचा सवाल उपस्थित करत हॉटेलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोस्टमधून केवळ एका व्यक्तीच्या भूमिकेवर टीका करण्यात आलेली नाही, तर त्याच्या व्यवसायाशी संबंधित ग्राहकांनाही दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या व्यावसायिकाच्या वैयक्तिक भाषिक भूमिकेचा आधार घेऊन त्याच्या व्यवसायावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या संपूर्ण प्रकारावर हॉटेल विराटचे उद्योजक कपिल भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हॉटेलमध्ये कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जवळपास ६० ते ७० टक्के व्यवहार कन्नड भाषेतून होतात. कन्नड भाषिक ग्राहकांशी किंवा नागरिकांशी आपले कोणतेही वैर नाही. त्यांच्या भाषेबद्दलही आपल्याला आदर आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. कन्नड भाषिकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे, अशी स्पष्ट भूमिका भोसले यांनी मांडली आहे.

त्यामुळे कन्नड भाषेचा वापर करणाऱ्या आणि कन्नड भाषिक ग्राहकांनाही सेवा देणाऱ्या व्यावसायिकाला केवळ काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे विरोधाचे लक्ष्य केले जात असेल, तर हा विरोध नेमका कोणत्या भूमिकेतून केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. भाषेचा अभिमान बाळगण्याचा अधिकार एका भाषिक समूहापुरताच मर्यादित असू शकत नाही. मराठी माणसाने आपली भाषिक अस्मिता जपली, तर त्याला व्यवसायाच्या माध्यमातून शिक्षा देण्याचा प्रयत्न होणे ही चिंतेची बाब आहे.

सोशल मीडियावरील बहिष्काराच्या आवाहनापुरताच हा प्रकार मर्यादित नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. काही कन्नड संघटनांकडून शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून कपिल भोसले यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे एका उद्योजकाच्या व्यवसायात प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या आरोपांची अधिकृत पातळीवर दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

व्यवसाय आणि भाषिक अस्मिता या दोन स्वतंत्र बाबी आहेत. एखाद्या व्यक्तीची राजकीय, सामाजिक किंवा भाषिक भूमिका पटत नसेल, तर लोकशाही मार्गाने त्यावर मत व्यक्त करता येते. मात्र, त्याच्या व्यवसायावर बहिष्कार टाकण्यासाठी संघटित आवाहन करणे, ग्राहकांना धमकावण्याच्या स्वरूपाचे संदेश प्रसारित करणे किंवा प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप होणे, ही बाब गंभीर आहे. बेळगावसारख्या बहुभाषिक शहरात परस्परांच्या भाषिक भावना आणि व्यवसाय करण्याच्या अधिकाराचा आदर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बेळगावमध्ये अनेक मराठी उद्योजकांनी स्वतःच्या मेहनतीवर व्यवसाय उभे केले आहेत. त्यांचे ग्राहक मराठी, कन्नड तसेच अन्य भाषिक समाजातील आहेत. कोणत्याही भाषिक भेदभावाशिवाय सर्वांना सेवा देत हे उद्योजक आपला व्यवसाय चालवत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या उद्योजकाने मराठी भाषिकांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून त्याला लक्ष्य केले जात असेल, तर त्याकडे केवळ एका हॉटेलपुरता मर्यादित प्रश्न म्हणून पाहता येणार नाही.

आज हॉटेल विराटचे कपिल भोसले लक्ष्य होत असतील, तर उद्या अन्य मराठी उद्योजकांनाही अशाच प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागणार नाही, याची काय हमी? त्यामुळे मराठी भाषिकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मराठी भाषिकांनी आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या व्यवसायाला पाठबळ देणे आणि अन्यायकारक बहिष्काराच्या आवाहनांना लोकशाही मार्गाने उत्तर देणे आवश्यक आहे.

काळ्या दिनाला उपस्थित राहणे हा कपिल भोसले यांचा भाषिक आणि वैयक्तिक निर्णय आहे. त्या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला लक्ष्य करण्याचा कोणालाही अधिकार मिळत नाही. मराठी अस्मिता जपणे आणि व्यवसाय करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत. त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणापुढे आपल्या भाषिक निष्ठेचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. बेळगावमध्ये प्रत्येक भाषिकाला आपली भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा समान अधिकार आहे. त्यामुळे मराठी उद्योजकांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबवावेत आणि या प्रकरणातील आरोपांची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.