belgaum

मोटार पंपांची चोरी करणारे गजाआड; ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह | बेळगाव

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बसवलेले मोटार पंप आणि केबल वायर चोरणाऱ्या दोघांना मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून १२ मोटार पंप, ३०० मीटर केबल वायर आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हुदली गावातील सर्व्हे क्रमांक ७०/५ मधील शेतात बसवलेला टेक्समो कंपनीचा ५ एचपी क्षमतेचा मोटार पंप १५ ऑक्टोबर रोजी चोरीला गेला होता. या पंपाची किंमत २० हजार रुपये होती. याशिवाय हुदली परिसरातील इतर गावांमधील शेतकऱ्यांचेही मोटार पंप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

 belgaum

मोटार पंप आणि केबल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने २२ ऑक्टोबर रोजी मारिहाळ-तुम्मरगुड्डी रस्त्यावर दुचाकीवरून पोत्यात मोटार पंप घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हुदली, तुम्मरगुड्डी, मारिहाळ, खानगाव, रंगदोळी आणि परिसरातील इतर गावांमध्ये मोटार पंप व केबल वायर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुडदप्पा निंगाप्पा तळवार (वय ३६, रा. तुम्मरगुड्डी) आणि कल्लाप्पा लक्काप्पा नायक (वय ४२, रा. करिकट्टी) अशी आहेत.

आरोपींकडून चोरीचे १२ मोटार पंप, ३०० मीटर केबल वायर आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारिहाळ पोलीस करत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, पीएसआय चंद्रशेखर सी. आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.