belgaum

हाय रिटर्न’चे आमिष; बेळगावातील दोन गुंतवणूक कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जास्त व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केल्याच्या आरोपावरून बेळगावातील आणखी दोन खासगी गुंतवणूक कंपन्यांवर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने छापा टाकला. अलीकडेच शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटल यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ही आणखी एक मोठी कारवाई असून, बेकायदेशीर गुंतवणूक संस्थांविरोधातील प्रशासनाची मोहीम सुरूच आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने टिळकवाडी येथील ग्रोधन एलएलपी तसेच महात्मा फुले रोडवरील सिटी इंडेक्स या कंपन्यांच्या कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली.

प्राथमिक चौकशीत या कंपन्यांनी नागरिकांना दरमहा ४ ते ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी गोळा केल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांची माहिती आणि विविध कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत तपासणी केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 belgaum

उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोधन एलएलपी या संस्थेने सुमारे १,१०० गुंतवणूकदारांकडून ३८ कोटी रुपये जमा केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. अनेकांकडून खासगी कर्जाच्या स्वरूपात पैसे घेऊन गुंतवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.

तर सिटी इंडेक्स कंपनीकडे सुमारे १,५०० गुंतवणूकदारांनी ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कंपनीने डिबेंचरच्या माध्यमातून नागरिकांकडून निधी उभारल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली असून, तिच्या व्यवहारांची कायदेशीरता आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

ग्रोधन एलएलपीबाबतचा प्राथमिक तपास अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तर सिटी इंडेक्सवरील तपास शनिवारीही सुरू राहणार असून, संपूर्ण अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे श्रवणकुमार नाईक यांनी सांगितले.

नागरिकांच्या पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अलीकडील काळात जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित गुंतवणूक कंपन्यांविरोधात बेळगाव जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा बनावट किंवा संशयास्पद आर्थिक संस्थांवर कोणतीही दया न दाखवता कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.