belgaum

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी बेळगावच्या या खेळाडूची संघात निवड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या स्विमर्स क्लबचा प्रतिभावान पॅरा जलतरणपटू स्वातिक पाटील याची २०२६ कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्वातिकने पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (SB9) प्रकारासाठी पात्रता मिळवली असून, तो २१ जुलै रोजी भारतीय पथकासोबत नवी दिल्लीहून रवाना होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी होणार असून, स्वातिकची स्पर्धा २७ जुलै रोजी होणार आहे.

निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना स्वातिक पाटील म्हणाला, “कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. माझे प्रशिक्षक, कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाले. मात्र हा प्रवास इथेच थांबणार नाही. पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी पदक जिंकणे हेच माझे अंतिम ध्येय आहे.”

 belgaum

मुतगा (बेळगाव) येथील रहिवासी असलेला स्वातिक हा नारायण पाटील आणि चंगुणा पाटील यांचा सुपुत्र आहे. त्याने एनआयटी अलाहाबाद येथून पदवी शिक्षण पूर्ण केले असून, सध्या झॉपिंग (Zopping) या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे.

स्वातिक सध्या बेळगावमधील सुवर्ण JNMC ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात तसेच बेंगळुरू येथील नेट्टाकल्लप्पा स्विमिंग सेंटरमध्ये नियमित सराव करत आहे. उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अंकुश कणबर्कर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या प्रशिक्षणाखाली तो दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी तीन तास सराव करतो.

स्वातिकला डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, KLE सोसायटी), जयंत हुंबरवाडी (जयभारत फाउंडेशन), दिलीप चिटणीस (पॉलीहायड्रॉन फाउंडेशन), राम मल्ल्या (CMD, Allied Founders), SLK ग्रुप, डॉ. नितीन खोत, रोटेरियन अविनाश पोतदार, मानेक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

स्वातिकच्या निवडीमुळे बेळगाव आणि कर्नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.