belgaum

दुहेरी हत्येचे कारण अखेर स्पष्ट; संपत्तीच्या वादातून दोन मेहुण्यांचा खून, आठ जणांना अटक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी येथे घडलेल्या दुहेरी हत्येचे कारण अखेर समोर आले आहे. संपत्तीतील हिस्सा न दिल्याच्या वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचे मुरगोड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

मुरगोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी फक्कीरप्पा नीलप्पा रामण्णवर यांच्या कुटुंबात संपत्तीच्या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. मोठा मुलगा यल्लप्पा याची पत्नी अण्णव्वा ही अनेक वर्षांपासून माहेरी राहत होती. न्यायालयात तडजोड होऊन तिच्या मुलाला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक एकर जमीन देण्याचे मान्य करण्यात आले होते.

मात्र, 15 जुलै रोजी अण्णव्वाने मुलाच्या वाट्याच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमापकांना बोलावल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. “मुलगा सज्ञान झाल्यानंतरच जमीन दिली जाईल,” असे सांगितल्यामुळे आरोपी संतप्त झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 belgaum

याच रागातून 16 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास आरोपींनी काठ्या, लोखंडी रॉड आणि दगड घेऊन फिर्यादीच्या घरावर हल्ला चढवला. घराबाहेर झोपलेल्या बसप्पा आणि त्यांचा मुलगा बाळेश यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत लगमण्णा यांच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.

त्यानंतर बसप्पा आणि लगमण्णा यांना घराबाहेर ओढून अंगणात आणत त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर काठ्या व लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी फक्कीरप्पा आणि त्यांचा नातू बाळेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांचाही खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तसेच, “संपत्तीतील हिस्सा दिला नाही तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 310/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.