बेळगाव लाईव्ह :
मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठी आर्थिक परिस्थितीच लागते असे नाही, तर योग्य वेळी मिळालेला आधारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण अत्यंत गुणवंत विद्यार्थिनी अश्विनी पुजारी हिच्या आयआयटीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याच्या स्वप्नाला संजीवीनी फौंडेशनने पुन्हा एकदा बळ दिले आहे.
फौंडेशनतर्फे अश्विनीच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरून तिच्या उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर करण्यात आला आहे. यापूर्वीही फौंडेशनने तिची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारत मूडबिद्री येथील अल्वास महाविद्यालयात पीयूसी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळवून दिला होता. एवढेच नव्हे, तर संपूर्ण वर्षभराचा वसतिगृह खर्चही उचलला होता.
या मदतीच्या बळावर अश्विनीने प्रथम वर्षात उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले. आता ती आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याच्या ध्येयाने जेईई परीक्षेची तयारी करत असून तिच्या या प्रवासात संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि शिक्षिका मुक्ता मोटराचे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे.
संजीवीनी फौंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले की, फौंडेशनतर्फे “वृद्धांना आधार”, “रुग्णांना आधार” आणि “विद्या आधार” या योजना राबविल्या जात आहेत. अश्विनीला ‘विद्या आधार’ योजनेअंतर्गत मदत करण्यात आली असून, याच योजनेतून आणखी एका होतकरू विद्यार्थिनीच्या एमबीए शिक्षणाचाही संपूर्ण खर्च फौंडेशन उचलत आहे.
ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांची स्वप्ने आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहू नयेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मदन बामणे यांनी स्पष्ट केले.
संजीवीनी फौंडेशनच्या या मदतीबद्दल अश्विनीचे पालक आणि शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, योग्य वेळी मिळालेल्या या आधारामुळे अश्विनीचे आयआयटीचे स्वप्न साकार होण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.





