बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात गेल्या अवघ्या दोन महिन्यांत बेकायदेशीर ठेव योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची लूट करणारी एकामागून एक तीन मोठी प्रकरणे समोर आली आहेत. आधी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणारी ‘शिवम असोसिएट्स’ आणि त्यानंतर शेकडो कोटी रुपये लाटणारी ‘आदित्यराज कॅपिटल’ या संस्थांची फसवणूक उघडकीस आल्यानंतर, आता ‘अॅपेक्स बिझकॉर्प एलएलपी’ या व्यापारी संस्थेनेही नागरिकांना मोठा आर्थिक फटका दिला आहे.
या लागोपाठ उघड झालेल्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, नियमानुसार घोटाळ्याची रक्कम पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास हा तपास आपोआपच राज्य यंत्रणेकडे वर्ग केला जातो, त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशा फसव्या योजनांमध्ये कमी वेळात अधिक परतावा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून हजारो नागरिकांनी आपली आयुष्यभराची पुंजी गमावली आहे. महिन्याला मिळणाऱ्या मोठ्या व्याजाच्या हव्यासापोटी समाजातील कोणताही घटक यातून सुटू शकलेला नाही. देशाचे रक्षण करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या हक्काचे पैसे, शासकीय कर्मचाऱ्यांनी भविष्यनिर्वाहासाठी साठवलेली रक्कम, महिलांनी घरखर्चातून केलेली बचत आणि कष्टकरी शेतकऱ्यांनी उन्हातान्हात घाम गाळून कमावलेले उत्पन्न या भामट्यांच्या हवाली केले. कष्ट न करता अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या चक्रव्यूहात अडकून अनेकांनी बँकांकडून कर्ज काढून किंवा जमिनी विकून या संस्थांमध्ये गुंतवणूक केली होती, जी आता पूर्णपणे बुडाल्याचे समोर येत आहे.
अधिकृत नोंदणीनुसार, ही ‘अॅपेक्स बिझकॉर्प एलएलपी’ नावाची भागीदारी संस्था १० जानेवारी २०२४ रोजी स्थापन करण्यात आली होती. टिळकवाडी येथील मंगळवार पेठेतील रेणुका निवास इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून या संस्थेचे कामकाज चालत होते. अल्पावधीतच या संस्थेने दरमहा चार टक्के आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल तीन हजारांहून अधिक ठेवीदारांकडून सुमारे १६० कोटी रुपये गोळा केले. मात्र, काही काळाने या संस्थेने लोकांना परतावा देणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे पूर्णपणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करत चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी गोकाक तालुक्यातील कौजलगी गावचे रहिवासी अशोक बिसगुप्पी यांनी दिलेल्या तक्रारीवरून टिळकवाडी पोलीस ठाण्यात संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ महादेव वाघमारे, व्यवस्थापकीय संचालक गणेश परशुराम भंडारे, उपव्यवस्थापक संतोष आणि इतर भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या संशयितांवर कर्नाटक वित्तीय संस्थांमधील ठेवदार हितसंबंध संरक्षण कायदा (केपीआयडी), अनियंत्रित ठेव योजना बंदी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. बेळगावमधील आर्थिक फसवणुकीची ही मालिका अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली आहे. यापूर्वी ‘शिवम असोसिएट्स’च्या प्रमुखाला अटक करून त्याची तीसहून अधिक बँक खाती गोठवण्यात आली होती, तर ‘आदित्यराज कॅपिटल’च्या मुख्य संशयिताने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. आता या तिन्ही मोठ्या प्रकरणांचा तपास एकाच वेळी गुन्हे अन्वेषण विभागाकडे आल्यामुळे, या संस्थांचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि लोकांकडून गोळा केलेल्या निधीचा माग काढून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.





