बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
बेळगाव शहरात मे ते जुलै या कालावधीत राकसकोप आणि हिडकल धरणातील पाणीसाठा खालावल्याने तीव्र जलटंचाई निर्माण होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी चंदगड तालुक्यातील तिलारी धरण आणि राकसकोप जलाशय राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पांतर्गत जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
तिलारी धरणात जलविद्युत निर्मितीनंतर मे ते जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोप जलाशयात वळवल्यास बेळगाव शहर आणि परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, तसेच मार्कंडेय नदी पात्राद्वारे या पाण्याचा शेतीसाठीही मोठा फायदा होईल, असे माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर यांनी सांगितले.
या प्रस्तावावर खासदार जगदीश शेट्टर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत तिलारी धरण परिसराची संयुक्त पाहणी करून पुढील योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला माजी नगरसेवक दीपक वाघेला, लतीफ पठाण, वंदना बेळगुंदकर, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे, सुनील बाळेकुंद्री, विनायक गुंजटकर, एन. बी. निर्वाणी, नेताजी जाधव, रेणू किल्लेकर, रमेश कळसनावर, मनोहर हलगेकर, रूपा नेसरकर, शांतिनाथ बुडवी, राजेश तिरकन्नावर, सुधा भातकांडे, अनिता किटवडकर, नीलिमा चव्हाण, सतीश म्हारदोळकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.





