बेळगाव लाईव्ह : शहरातील क्लब, रमी क्लब, जिमखाना आणि इतर मनोरंजन केंद्रांवर बेळगाव शहर पोलीस विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील अशा संस्थांची तपासणी करून 10 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तपासणीदरम्यान संबंधित क्लब आवश्यक परवाने घेऊन कार्यरत आहेत का, तसेच ते कर्नाटक उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात का, याची पडताळणी केली जाणार आहे. विशेषतः रमी किंवा पत्त्यांचे खेळ सुरू असलेल्या क्लबना उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार लागू असलेल्या अटींचे लेखी पालन करावे लागणार असून त्याची पोचही घेतली जाणार आहे.
पोलीस विभागाच्या प्रमुख अटी अशा…
- प्रवेशद्वार व खेळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य.
- सीसीटीव्हीचे किमान 15 दिवसांचे फुटेज जतन करून मागणी होताच पोलिसांना उपलब्ध करून देणे.
- प्रत्येक सदस्याला ओळखपत्र देणे.
- सदस्य नसलेल्या व्यक्ती किंवा पाहुण्यांना खेळात सहभागी होऊ न देणे.
- पैशांची पैज, बेटिंग, जुगार किंवा कोणत्याही बेकायदेशीर खेळांना परवानगी नसणार.
- पोलीस तपासणी व देखरेखीस पूर्ण सहकार्य करणे.
पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे की, तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कठोर कारवाईही केली जाईल.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश कायदेशीररित्या चालणाऱ्या क्लबांना त्रास देणे नसून, बेकायदेशीर जुगार, बेटिंग आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर प्रभावी आळा घालणे हा आहे.





